कोरोना दुसऱ्या लाटेतील नव्या स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, तर राजस्थानातून उगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:31+5:302021-04-28T04:14:31+5:30
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नवा स्ट्रेनसाठी अमरावती हे नाव पुढे आले असले तरी राजस्थान येथे डिसेंबर २०२० मध्ये ...
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नवा स्ट्रेनसाठी अमरावती हे नाव पुढे आले असले तरी राजस्थान येथे डिसेंबर २०२० मध्ये तो आढळून आला. तशी नोंद हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी केल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-१९ नमुने चाचणी प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाची दुसरी लाट पसरविणारा नवा स्ट्रेन अमरावतीत आढळून आल्याची चर्चा होत असून, काही प्रसारमाध्यमांवर तशा बातम्या झळकत आहेत. त्यामुळे अमरावतीकर भयभीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशांत ठाकरे यांनी डबल म्युरेअन म्युटंट ‘ई४८४क्यू’ व ‘एल४५२आर’ हे आहेत. यात एकूण १५ म्युरेअन असून, हा विषाणूचा एक भाग आहे. आतापर्यंत सहा म्युरेअन आढळले आहेत. त्यापैकी हे दोन म्युरेअन महत्त्वाचे आहेत. डबल म्युरेअन म्युटंट हा डिसेंबर २०२० मध्ये आढळून आला आहे. हा नवा स्ट्रेन नाही. हल्ली ७० टक्के नमुन्यात तो आढळत आहे. त्याचा उगम अमरावती येथे असल्याचे म्हणता येणार नाही, अशी पुष्टीही ठाकरे यांनी दिली. आतापर्यंत डबल म्युरेअन म्युटंट हा ग्रीस, यूके येथेही आढळून आला आहे. त्यामुळे डबल म्युरेअन म्युटंटचा अमरावती येथून उगम झाला, असे म्हटले जात असल्याने विदर्भात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दुसरा स्ट्रेन हिंगोली, अकोला येथेही आढळून आला आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये, मास्कचा वापर करावा, नियमित हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे आणि कोरोनाला पळवावे, असे आवाहन प्रशांत ठाकरे यांनी केले आहे.
--------------
कोरोना संसर्गाचा वेग वाढला
अमरावती जिल्ह्यात मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत एक लाखांवर नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. संसर्गाचा दर वेगवान असल्याने कुटुंबात एका सदस्याला कोरोनाची लागण झाली की, संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळते, अशी स्थिती आहे. संक्रमणासह मृत्यूदरही वाढत आहे. प्रत्येक महिन्यात कोरोनाच्या विषाणूत जनुकीय बदल होत आहेत. याबाबत (व्हेरिअंट ऑफ कन्सल्ट) विश्लेषण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नमुने पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविले जात असल्याची माहिती प्रशांत ठाकरे यांनी दिली.