अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे

By प्रदीप भाकरे | Published: March 21, 2023 02:14 PM2023-03-21T14:14:04+5:302023-03-21T14:22:01+5:30

हेल्थ अँड वेलनेस सेंटर : आयुक्तांचा सकारात्मक पाठपुरावा, जुन्यांची रखडगाडी

Newly 17 Arogyavardhini health centres starts in Ambanagari Amravati | अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे

अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे

googlenewsNext

अमरावती : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याकरिता जागेची पाहणी करण्यात येत असून, जागा उपलब्धतेनंतर त्या ठिकाणी नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहराची वाढती व्याप्ती पाहता, आधी मंजूर केलेले १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे पुरेसी नसून, अजून १७ केंद्रांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी आरोग्य विभागाकडे केली होती. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. याआधी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. ती केंद्रे २६ जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते. मात्र, ती अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्या केंद्रातील डॉक्टरांसाठी मागील आठवड्यात जाहिरात देण्यात आली आहे. सहा-सात महिन्यांपूर्वी मंजूर झालेली ती १२ हेल्थ अँड वेलनेस सेंटर तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांना दिले आहेत.

हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये काय?

गरोदर माता, स्तनदा माता, नवजात शिशू, बालक, किशोरवयीन मुले-मुली, साथरोग, लहान आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोगांसाठी स्क्रिनिंग, प्रतिबंधात्मक, नियंत्रण आणि उपचार सेवा, सामान्य क्षेत्र आणि कान-नाक-घसा यांच्या आजारासंबंधी सेवा, मूलभूत मौखिक आरोग्य सेवा, वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मूलभूत मानसिक विकारांसाठी स्क्रिनिंग आणि प्राथमिक सेवा, योगा आणि इतर आयुष सेवा आदी आरोग्य सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील.

गतवर्षी मंजूर झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांची कार्यान्वयन तथा अंमलबजावणी अखेरच्या टप्प्यात आहे. शहराची व्याप्ती व वाढती लोकसंख्या पाहता नव्याने शहरात १७ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीला मान्यता देण्यात आली आहे.

- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त
 

Web Title: Newly 17 Arogyavardhini health centres starts in Ambanagari Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.