दुसऱ्याच दिवशी स्वयंचलित जिना सरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:15 AM2019-08-13T01:15:31+5:302019-08-13T01:16:48+5:30
रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच्याकडून करण्यात आला.
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच्याकडून करण्यात आला.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ११ आॅगस्ट रोजी स्वयंचलित जिन्याचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांच्या वापरासाठी तो खुला झाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळपासून ते दुपारपर्यंत स्वयंचलित जिना काही खोडसाळ मुलांनी आठ ते दहावेळा बंद केल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाला जिना बंद ठेवावा लागला.
बंद जिन्याचा काही मुलांनी घसरगुंडी म्हणूनदेखील वापर केला. या जिन्याहून सध्या चढता येते, मात्र उतरता येत नाही. स्वयंचलित जिन्यावरून उतरू नये, या आशयाचे फलकच तेथे लावण्यात आले आहे.
जिना चुकीच्या ठिकाणी?
जिना नव्या पादचारी पुलाला जोडण्यात आला. मात्र, या पुलावरून प्रवाशांची गर्दी कमी असते. जुन्या पादचारी पुलालगत तिकीट बूकिंग कार्यालय आहे. याच पुलाजवळ स्वयंचलित जिना बसवायला पाहिजे होता, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. तिकीट काढल्यानंतर वृद्ध प्रवाशांना येथून बरेच दूरपर्यंत चालत जाऊन जिना चढावा लागतो. यामुळे तो चुकीच्या ठिकाणी लावल्याचा आक्षेपही प्रवाशांनी घेतला आहे.
कर्मचारी तैनात करा, प्रवाशांची मागणी
स्वयंचलित जिन्यावरून नवलाई म्हणून परिसरातील काही मुले चढण्यासाठी गर्दी करीत होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. अंगवळणी पडेपर्यंत या जिन्याच्या ठिकाणी कर्मचारी नेमणे अत्यंत गरजेचे आहे. तशी मागणीच तोंडी स्वरूपात प्रवाशांंची होती. जिना जेवढा कामाचा, तेवढाच धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
इंटेरिअर डेकोरेशनला पडले भगदाड
जिन्याच्या आजूबाजूला असणारे इंटेरियर डेकोरेशनला पहिल्याच दिवशी भगदाड पडले. ते कशामुळे पडले, हे मात्र समजू शकले नाही.