दुसऱ्या दिवशीही लावल्या आगी
By admin | Published: May 7, 2017 12:08 AM2017-05-07T00:08:44+5:302017-05-07T00:08:44+5:30
जिल्ह्यात राज्य महामार्गावरील लहान- मोठी झाडे जाळणारी टोळी सक्रिय झाली आहे.
फौजदारी तक्रारी दाखल करा : अधीक्षक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंत्यांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात राज्य महामार्गावरील लहान- मोठी झाडे जाळणारी टोळी सक्रिय झाली आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशीही दर्यापूर- अमरावती राज्य महामार्गावरील झाडे जाळण्यात आल्यामुळे जो कुणी अज्ञात व्यक्ती या झाडांना आग लावून राष्ट्रीय संपतीला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल त्याच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रारी दाखल करून करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
दर्यापूर- मूर्तिजापूर मार्गावरील गणेशपूर नजीकच्या शेताजवळील धुऱ्याला आग लावून जिवंत झाडे जाळण्याचा प्रताप काही अज्ञात व्यक्तीने केला होता. शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दर्यापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल जवंजाळ यांना दिल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. त्यामुळे त्वरित आगीवर नियंत्रण मिळाल्याने इतर झाडे जळण्यापासून वाचविण्यात आले होते. परंतु यानंतर आगीचे सत्र थांबलेले नाहीत.
पुन्हा काही लोकांनी दर्यापूर- अमरावती मार्गाजवळील हॉटेल मोहिनी नजीक आग लावली. त्यामध्ये येथील वाळलेले गवत पेटत जाऊन वीज वितरण कंपनीच्या जिवंत विद्युत तारांनाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथे लावण्यात आलेली डीबीसुध्दा जळण्याची शक्यता होती. हा प्रकार गंभीर असून आगी लावून झाडे जाळण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, अशी मागणी होत आहे. रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे आगी लावून जिवंत झाडे जाळली जात आहे. दर्यापूर-अमरावती मार्गावर आतापर्यंत २७ झाडे जाळण्यात आलेली आहेत. अमरावती- चांदूरबाजार मार्गावर नया अकोला जवळ १० ते १५ झाडे जाळून नष्ट करण्यात आलेले आहेत. अनिरूध्द राऊत या सामाजिक कार्यकर्त्याने तर चक्क झाडे जळताना छायाचित्रिकरण मोबाईलमध्ये करून आणली, हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. तसेच अमरावती- परतवाडा रस्त्या लगतच्या झाडांनाही आगी लावल्या जात आहेत.
एकीकडे सामाजिक वनीकरण व इतर विभाग दोन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे सामाजिक वनिकरण विभागाने लावलेली झाडेसुध्दा या अवैध आगीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मागील दोन वर्षात लावलेली रोपटे आता कुठे मोठी होत आहे. पण शेताच्या धुऱ्या नजीक लावलेल्या आगीत ही रोपटे जळून खाक होत आहे. त्यामुळे सामाजिक वनिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची मेहनत खऱ्या अर्थाने व्यर्थ जात आहे.
झाडांना आगी लावण्याचा प्र्रकार हा गंभीर आहे. मी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या आहे. जर कुणी अज्ञात व्यक्ती हेतुपुरस्सर आगी लावत असेल तर त्याची संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे.
- विवेक साळवे,
अधीक्षक अभियंता अमरावती
रस्त्यालगतची शेकडो झाडे जाळण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांद्वारे सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक वनिकरण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- शेखर पाटील,
सामाजिक कार्यकर्ता दर्यापूर.