रात्रीला रेती तस्करीला उधाण, महसूल बुडीत
By admin | Published: November 23, 2015 12:18 AM2015-11-23T00:18:10+5:302015-11-23T00:18:10+5:30
तालुक्यातील रेतीघाट बेवारस अवस्थेत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. नव्याने निविदा प्रक्रियेला सुरुवात...
भरारी पथक बेपत्ता : मेळघाटात रेती माफियांची चांदी
धारणी : तालुक्यातील रेतीघाट बेवारस अवस्थेत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. नव्याने निविदा प्रक्रियेला सुरुवात व्हायचे असल्याने सध्या तापी, गडगा, सिपना व इतर लहान-मोठे नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर आहे. दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे ट्रॅक्टर नदीनाल्यात उतरतात आणि रेती भरून गरजूंना पोहोचवित आहे.
या रेती तस्करांची माहिती महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि कोतवाल व पोलीस पाटील यांना असतानाही ते तस्करांशी साटेलोटे करून राजस्व विभागाला चुना लावण्याचा काम करीत आहे. या कामात तर काही हलक्याचे तलाठींचे ट्रॅक्टर पार्टनरशिप तत्त्वावरच सुरू असल्याची माहिती आहे. या पार्टनरशिपची चर्चा गावात घर आहेच पण महसूल अधिकाऱ्यांपर्यंतसुद्धा याची माहिती आहे. परंतु सर्वांनी आपले आर्थिक हित साध्य करीत या अवैध व्यवसायाला खतपाणी घालीत आहेत.
तस्करांवर नजर ठेवण्यासाठी तहसील स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली. मात्र भरारी पथके केवळ कागदावरच शोभा वाढविताना दिसून येत आहे. केवळ तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना मिळाल्यावर त्यांनी स्वत: कार्यवाही केल्यास रेती तस्कर सापडतात. अन्यथा उर्वरित कर्मचारी पकडून परस्पर विल्हेवाट लावण्यातच धन्यता मानीत आहेत.
सध्या उतावली, चाकर्दा, कारादा या गावालगत सिपना नदीवरील तर राणीतंबोली, रोहणीखेडा, धुळघाट या गावाजवळील गडगा नदी आणि सोनाबर्डी, खाऱ्या, टेंभरू, बैरागड, कुटंगा या गावालगतच्या तापी नदीवरील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू आहे. धारणी शहरातही घराच्या बांधकामासाठी चोरट्या मार्गाने रेती आणली जात आहे. यासाठी मध्यरात्री व पहाटेची वेळ तस्करांनी निवडली आहे. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रेती तस्करीला आळा घालण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)