रात्रीचा प्रवास धोक्याचाच; श्वानांच्या झुंडीने घेतला रस्त्याचा ताबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:42+5:302021-09-13T04:11:42+5:30
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकाट श्वानांना जिवे मारता येत नाही. त्यामुळे श्वानांची संख्या बेसुमार वाढीस लागली आहे. अशातच ...
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकाट श्वानांना जिवे मारता येत नाही. त्यामुळे श्वानांची संख्या बेसुमार वाढीस लागली आहे. अशातच महापालिका प्रशासनाकडून श्वानांचे निर्बिजीकरण थांबल्याने महानगरातील गल्ली- बोळात मोकाट श्वानांनी हैदोस घातला आहे. रात्रीला घरी जाताना मोकाट श्वान कधी हल्ली करतील, याचा नेम नाही. परिणामी आता चोरांची नव्हे तर मोकाट श्वानांची भीती वाटू लागली आहे.
यंदा जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यात २३८ जणांना श्वानांची चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अचानक मोकाट कुत्रे कसे वाढलेत, हा संशोेधनाचा विषय आहे. एक, दोन नव्हे तर १० ते १२ श्वानांच्या झुंडीमुळे रात्रीला अचानक मनुुष्यावर हल्ला करतात, अशा घटनादेखील घडत आहेत. बडनेरा मार्गावर नवाथेनगर, साईनगर, चपराशीपुरा, विलासनगर, लक्ष्मीनगर, राधानगर, नवसारी, पठाणचौक, वडाळी, यशोदानगर, कंवरनगर, बडनेरा येथील जुनीवस्ती, नवीवस्तीत मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे लहान मुलांना धोका वाढला आहे.
--------------------
या चौकात जरा सांभाळून
मोकाट श्वानांची संख्या बेसुमार वाढली आहे. श्वानांच्या झुंडी कोणत्या क्षणी हल्ला करतील, याचा नेम नाही, त्यामुळे चपराशीपुरा, वडाळी, राहुलनगर, नमुना, यशोदानगर, विद्यापीठ चौक, गाडगेनगर, राधानगर, रामपुरी कॅम्प तसेच बडनेरा नवीवस्ती, जुनीवस्तीच्या चौकात जरा सांभाळून जावे लागते.
---------------------
भीक नको पण कुत्रे आवरा हो!
महिना श्वानदंश
जानेवारी १८
फेब्रुवारी १२
मार्च १९
एप्रिल २३
मे २२
जून ४९
जुलै ५५
ऑगस्ट ६८
-------------------------
कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखोंचा खर्च गेला पाण्यात
- अमरावती महापालिकेने गत चार वर्षापूर्वी श्वानांचे निर्बिजीकरण केेले होते. या दरम्यान निर्बिजीकरणावर लाखोंचा खर्चही झाला. मात्र, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे श्वानांचे निर्बिजीकरण थांबले आहे.
- श्वान निर्बिजीकरण करणाऱ्या दोन एनजीओ संस्थांनी देयके मिळाली नाहीत, याप्रकरणी कोर्टात धाव
घेतली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवित असल्याची माहिती आहे.
---------------------
महापालिका दवाखान्यात ॲन्टी रेबीजचा तुटवडा
श्वानांनी चावा घेतल्यानंतर उपाययोजना म्हणून अमरावती व बडनेरा येथील महापालिका दवाखान्यात ॲन्टी रेबीज ईजेक्शन नाही, अशी माहिती आहे. गत आठ महिन्यात २३८ जणांना श्वानांना चावा घेतल्याच्या
घटना निदर्शनास आल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही, याचे शल्य आहे.
-------------------------
शासन निर्णयानुसार मोकाट श्वान बंदोबस्तासाठी महापालिकेने पथक नेमले आहे. तक्रार आल्यास या
पथकाद्धारे घटनास्थळाहून श्वान ताब्यात घेतले जाते. निर्बिजीकरण तूर्त थांबले आहे. जून ते ऑक्टोबर या दरम्यान श्वानांचा समागम काळ असतो. त्यामुळे अलिकडे श्वान झुंडीने फिरतात.
- सचिन बोंद्रे, पशु वैद्यकीय अधिकारी.
-------------------------
आम्हाला चोराची नाही, कुत्र्याची वाटते भीती
श्वानांच्या झुंडीने आम्ही हैराण झालो आहेत. घरात लहान मुले असल्याने ती फाटकाबाहेर पडल्यास
मोकाट श्वानांचा हल्ला तर होणार नाही, अशी कायम भीती असते.
- रोशन चव्हाण. नागरिक
मोकाट कुत्र्यांवर महापालिकेचे अंकुश नाही. कोणत्याही भागात १० ते १२ मोकाट श्वानांच्या झुंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनाही वाढत आहेत. श्वानांचा त्वरेने बंदोबस्त व्हावा.
- किशोर इंगोेले, नागरिक