नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 10:24 PM2018-07-20T22:24:18+5:302018-07-20T22:25:34+5:30
अतिदुर्गम भागात नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवनदान देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित मोबाईल मेडिकल युनिट मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा पुरवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : अतिदुर्गम भागात नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवनदान देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित मोबाईल मेडिकल युनिट मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा पुरवित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, धूळघाट रेल्वेच्या अंतर्गत गोलाई (ता. धारणी) या गावात मोबाईल मेडिकल युनिटची चमू ९ जुलै रोजी वैद्यकीय सेवा देण्याकरिता पोहोचली असता, तेथील गर्भवती माता मसुरी मुकेश डुडवा (२०) हिला दुपारचे वेळी अचानक असह्य प्रसूतिवेदना होऊ लागल्या. रुग्णांची स्थिती लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा झोड यांनी अथक परिश्रम घेऊन गर्भवती मातेची यशस्वी प्रसूती केली व गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे जन्माचे वेळी २ किलो ४०० ग्रॅम इतके वजन होते. मसुरी या गर्भवती महिलेला भेट दिली असता, महिलेची पहिलीच प्रसुती आहे व पोटात बाळाचे ठोके कमी होत आहेत, असे निदर्शनास आले. मातेची धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्याने मातेला प्रसूतीसाठी घेतले. प्रसूतीदरम्यान बाळाने पोटात संडास केली होती. बाळ जन्माला आल्यानंतर रडले नाही. मातेची व बाळाची परिस्थिती अतिशय जोखमीची असताना घाबरून न जाता वैद्यकीय अधिकाºयांनी तब्बल ३५ मिनिटे बाळाला कृत्रिम श्वसन दिले. अखेर बाळाचे श्वसन चालू होऊन मूल रडले. यावेळी परिचारिका रंजना ढेबले यांनी मोलाची कामगिरी बजावली.
मोबाइल मेडिकल युनिट पथकाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा नामदेव झोड, परिचारिका रंजना ढेवले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्रिवेणी, फार्मासिस्ट योगेश मुंडे, वाहन चालक राजू शिरसकर व विठ्ठल गायकवाड या सर्वांचे सहकार्य लाभले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी वैद्यकीय चमूचे यशस्वी अभिनंदन केले आहे.