निमखेडच्या मुलाची हत्या नव्हे, नरबळीच ?

By admin | Published: November 8, 2015 12:15 AM2015-11-08T00:15:02+5:302015-11-08T00:15:02+5:30

निमखेड येथे चार दिवसांपूर्वी घडलेली घटना ही मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला.

Nimkhed's son is murdered, not all? | निमखेडच्या मुलाची हत्या नव्हे, नरबळीच ?

निमखेडच्या मुलाची हत्या नव्हे, नरबळीच ?

Next

तपासणीची मागणी : अनेकांचा सहभाग असल्याचा संशय
सुमित हरकूट चांदूरबाजार
निमखेड येथे चार दिवसांपूर्वी घडलेली घटना ही मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. गावातील म. उजैफ या १३ वर्षीय शाळकरी मुलाची निर्घृणपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत विहिरीत टाकले. हत्येचा एकंदरीत प्रकार पाहता ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
निमखेड गावातील म. कलीम शे. नाशीर (४०) यांना दोन अपत्ये आहेत. मुलगा मोठा, पाच वर्षाची मुलगी आहे. त्यांचा मुलगा चांदूरबाजार येथील नगरपरिषद उर्दू विद्यालयात शिकत होता. मो. उजैफची निर्घृण हत्या करून नराधमांनी घात केला व त्याच्या माता-पित्याचे स्वप्न धुळीत मिळाले. या घटनेने त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाला हादरा बसला.
मृताचे प्रेत विहिरीतून काढल्यानंतर त्याचे दोन्ही हात व पाय मागच्या बाजूला बांधलेले होते. गळ्याच्या मागच्या बाजूस दोन्ही कानापर्यंत धारदार शस्त्राचा घाव घालून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत विहिरीत टाकण्यात आले असल्याचे समजते. प्रत्यक्ष घटनास्थळावरून प्रेत बासाला लटकवून आणले असल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली. कारण विहिरीजवळ एक बासा रक्ताने माखलेला आढळला. तो बासा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एकंदरीत प्रेताची पाहणी केली असता हा प्रकार नरबळीच आहे, अशी शंका मृताच्या आजोबांसह गावकऱ्यांनी व्यक्त केली.

आमच्या मुलाच्या हत्येचा शोध घेऊन संबंधित दोषींना फासावर लटकवा. हत्याऱ्यांचा त्वरित शोध घेण्यासाठी तपास सीआयडीकडे द्या, ज्या निर्दयतेने आमच्या मुलाचे प्राण घेण्यात आले यावरून हा नरबळीच आहे, असे स्पष्ट होते. त्या नराधमांचा पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा.
- म. करीम शे. नसीर, साजेदा तब्बसुम, (मृताचे आई-वडील)

या घटनेच्या तपासाकरिता दोन पथके तयार केली आहे. एक पथक स्थानिक ठाण्यांतर्गत, दुसरे ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथून तपास कार्यरत आहे. दोन्ही पथकांचे तपास सुरू आहे. एक पथक मध्यप्रदेशातील आठनेरकडे रवाना झाले आहे. लवकरच आम्ही आरोपीचा शोध घेऊ.
- सतीशसिंह राजपूत, ठाणेदार.

मागील १५ वर्षांपासून आमचे गाव आदर्श गाव म्हणून गणले गेले आहे. परंतु या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरला आहे. ही घटना नरबळीची असून या घटनेचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे. गाव पातळीवरून गावातील व परिसरातील घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सदैव मदत करीत आहे.
- मो. जफीर शे. बशीर, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती.

Web Title: Nimkhed's son is murdered, not all?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.