वृक्षलागवडीसाठी नऊ लाख रोपे, ग्लोबल वार्मिंगसाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:42 PM2019-06-10T22:42:24+5:302019-06-10T22:42:45+5:30
एक जुलैपासून राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी परतवाडा येथील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध ४८ प्रजातींची जवळपास नऊ लक्ष ७० हजार रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. एका मोठ्या मोहिमेत या वृक्षांचा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : एक जुलैपासून राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी परतवाडा येथील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध ४८ प्रजातींची जवळपास नऊ लक्ष ७० हजार रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. एका मोठ्या मोहिमेत या वृक्षांचा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे.
तीन वर्षांपासून राज्यभर वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. ही वृक्ष लागवड सर्वसमावेशक असून, प्रत्येक घटक यात सहभागी होत आहे. वृक्षलागवडीसाठी वनविभाग सामाजिक वनीकरण याचप्रमाणे विविध यंत्रणांमार्फत रोपे तयार करण्याचे काम वर्षभरापूर्वीपासूनच राबविण्यात येत असल्याचे सवश्रुत आहे. विविध प्रजातींच्या झाडांचे बी आणून त्याला अंकुर फुटल्यावर रोपात रूपांतर करण्याचे काम रोपवाटिकांमध्ये केल्या जात आहे. तापत्या उन्हात सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना रोपवाटिकेतील मजूर अधिकारी या रोपांना वाचविण्याची कसरत करताना दिसत आहे. उन्हापासून रोप करपू नये, वर्षभर घेतलेले परिश्रम वाया जाऊ नये व वृक्ष लागवडीसाठी ही रोपे हिरवीगार आणि ताजी टवटवीत कशी राहतील, यासाठी रात्रंदिवस कटाक्ष पाळला जात आहे. दिवसेंदिवस वनस्पतींची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून, पर्यावरणास धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
आॅनलाईन खड्डे नोंदणीनुसार रोप वाटप
३३ कोटी वृक्ष लागवडीत ज्या शासकीय कार्यालयांनी, संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांची आॅनलाईन नोंदणी केली. खड्डे खोदण्याचे फोटोसुद्धा अपलोड करण्यात आले. त्यांना प्रथम रोपे देण्यात येणार असून त्यासोबतच वेळेवर आॅफलाइन येणाऱ्या काही सामाजिक संस्था,खाजगी नागरिक यांना सुद्धा रोपे देण्यात येईल. अमरावती येथे जिल्हा स्तरावरुन मॉनिटरिंग केले जाणार आहे.
वनविभाग आणि वनीकरणाची ९ लाख रोपे
परतवाडा वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाची वडगाव फत्तेपूर येथे रोपवाटिका असून येथे वर्षभरापासून वड ,पिंपळ, कडूनिंब, आवळा, सिताफळ ,टेटू, रक्तचंदन, बेहडा, हिरडा, बांबू, किमी, सागवान, आंबा, फणस, चिंच, गोंधन, कवस, निलगिरी, कडुबदाम, सरू अशा जवळपास ४८ प्रजातीच्या विविध झाडांची रोपे तयार करण्यात आली आहे. वडगाव फत्तेपूर येथील रोपवाटिकेत ६ लाख, पायविहिर रोपवाटिकेत ५० हजार तर सामाजिक वनीकरण विभागाच्या वडगाव फत्तेपुर येथील नर्सरीत २ लाख ६८ हजार अशी एकूण ९ लाख रोप तयार करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शंकर बारखडे यांनी दिली.
वनविभाग आणि सामाजिक वनीकरणच्या वडगाव फत्तेपूर, पायविहिर रोपवाटिकेत जवळपास नऊ लाख रोपे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर झालेल्या नोंदणीनुसार ही रोपे वाटप केले जाणार आहेत.
- शंकर बारखडे,
वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा