तळवेल ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र
By admin | Published: January 31, 2015 01:00 AM2015-01-31T01:00:51+5:302015-01-31T01:00:51+5:30
तालुक्यातील तळवेल ग्रामपंचायतच्या ११ पैकी ९ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्याची बाब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समक्ष सादर केलेल्या ....
चांदूरबाजार : तालुक्यातील तळवेल ग्रामपंचायतच्या ११ पैकी ९ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्याची बाब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समक्ष सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाल्यामुळे ९ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी पारित करून या अपात्र सदस्यांना आदेशाच्या तारखेपासून पुढील पाच वर्षापर्यंत ग्रामपंचायतची निवडणूक लढण्यास ‘अनई’ घोषित केले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. एकाच ग्रामपंचायतमधील ११ पैकी ९ सदस्य अपात्र ठरल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी असेही राजकीय तज्ज्ञ सांगतात. येत्या एप्रिलमध्ये तालुक्यातील सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहे. तळवेल ग्रामपंचायती बाबतीत लागलेल्या निकालामुळे ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ माजली आहे.
तळवेल येथील रोहण जयवंत गवई यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) मधील तरतुदीनुसार तळवेल ग्रामपंचायतमधील सर्व ११ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यामुळे या सदस्यांना अपात्र घोषित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता. यावर दोन्ही बाजूकडून लेखी स्वरुपात साक्षीपुरावे सादर करण्यात आले. त्यात ग्रामपंचायत सदस्याकडून विहित मुदतीत खर्चाचे विवरण सादर केल्याचे व सर्व अभिलेख तहसील कार्यालयात सादर केल्याचे सांगून त्यासोबत शपथपत्रासह दाखल केल्याचे नमूद केले.
या प्रकरणात चांदूरबाजारच्या तहसीलदारांचा अहवाल मागविण्यात आला. त्यांनी ९ जून २०१४ रोजी सादर केलेल्या अहवालात तळवेल येथील ग्रामपंचायतच्या निवडणकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केल्याची नोंद तहसील दप्तरी आढळून आली नाही तर अशा उमेदवारांची यादीही तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी यांचेसमोर सादर केली. तद्नंतर या प्रकरणात तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी ईर्शादउल्लाखान यांना अहवाल मागविण्यात आला. त्यांच्या अहवालानुसार दीपक मेटकर व सुजाता वानखडे यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केल्याचे नमूद केले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हिशेब सादर न करणाऱ्या हिराबाई चंडिकापूरे, प्रवीण काळे, पद्मा मोहोड, शुद्धोधन वानखडे, चंद्रशेखर बोंडे, लता भोयर, कल्पना काळे, रामेश्वर भोवते, प्रतिभा गेडाम यांना शासन अधिनियम १६ अन्वये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणेनुसार आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अनर्ह घोषित केले आहे. तसेच या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)