महापालिकेला ५१ लाखांचा फटका !
By admin | Published: May 3, 2016 12:16 AM2016-05-03T00:16:49+5:302016-05-03T00:16:49+5:30
सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या सदोष समायोजनाने महानगरपालिकेला तब्बल ५० लाख ८७ हजार १५८ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शिक्षण उपसंचालकांकडून खर्च अमान्य : सदोष समायोेजन
अमरावती : सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या सदोष समायोजनाने महानगरपालिकेला तब्बल ५० लाख ८७ हजार १५८ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिक्षकांच्या चुकीच्या समायोजनावर शिक्षण उपसंचालक एस.बी कुळकर्णी यांनी ठपका ठेवला आहे. तथा ती मोठी रक्कम अमान्य केली आहे. सदर प्रकरण महापालिका आयुक्तांच्या दालनात पोहोचल्यावर त्यांनी ही रक्कम त्या कालावधीत कार्यरत असलेल्या संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश अधिनस्थांना दिलेत.
शासनाच्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांचे वेतन व भत्ते दिले जातात. वेतन अनुदानापैकी ५० टक्के रक्कम शिक्षण उपसंचालक स्तरावरून तर ५० टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागते. सन २०१४-१५ या वर्षात महापालिकेतील शिक्षण विभागाने सदोष समायोजन केले व त्यापोटी ५० लाख ८७ हजार १५८ रुपये खर्च केले. पदे रिक्त नसल्याने वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही, असा शेरा शिक्षण उपसंचालकांनी मारल्याने महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागला. महापालिका ही रक्कम संबंधित शिक्षकांना देवून चुकली आहे. ती रक्कम शिक्षण उपसंचालकांनी अमान्य केल्याने लिपिक, अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांसह लेखविभागाकडून ही रक्कम वसूल केली जाईल.
अमान्य केलेली रक्कम अमान्य करण्याची कारणे
१,७०,०४८ रु.श्रीमती अस्मा परविन शौकत उल्लाखान यांना महापालिकेत पद रिक्त नसताना समायोजित केल्यामुळे त्यांना देय्य असलेले व भविष्यात दिले जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.
४,११,७६४ रु.शबानाबानो इबादुल्ला खान यांना पंचायत समिती चांदूरबाजार येथून बदलीने रुजू करुन घेतले आहे. सदर नगर परिषदेमध्ये पद रिक्त नसल्यामुळे त्यांना देय असलेले व भविष्यात दिल्या जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.
६३,२०९ रु.मो.साबीर शेख बिसमिल्ला यांची भिवंडी निझामपूर येथून आंतर जिल्हा बदलीने मनपा मध्ये जागा नसतांना रुजू करुन घेतल्यामुळे त्यांना देय व भविष्यात दिल्या जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.
९,८४,९७९ रु.वर्षा दिपक पिंजरकर व मनिषा बदुकले यांना मराठी माध्यमामध्ये पद रिक्त नसतांना व अतिरिक्त शिक्षक असतांना रुजू करुन घेतल्यामुळे त्यांना दिलेले वेतन व भविष्यात देय असलेले वेतन अनुदानास पात्र ठरणार नाही
१०,३३,१४३ रु.मराठी माध्यमाचे अतिरिक्त शिक्षक असतांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन दोन शिक्षकांना रुजू करुन घेण्यात आले. तसेच सेवाजेष्ठतेनुसार १८ शिक्षण सेवक अतिरिक्त होत असतांना त्यांची माहिती दडवून ठेवली त्यातील सन २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार ९ शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे वेतनावर झालेला खर्च अमान्य करण्यात येत आहे.
२४,२४,०१५ रु. एचडीएफसी खाते क्रमांक ५०२००००३४१८५९१ मध्ये जमा करण्यात आलेली संपूर्ण रक्कम एक्सीस बॅकेत मनपा फंडात जमा करण्यात आली. तसेच वारंवार निर्देश देऊनही स्वतंत्र कॅशबुक न ठेवल्यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष केलेल्या खर्चावर २ टक्के (राज्य शासनाचा हिस्सा १ टक्के) दंडात्मक कार्यवाही म्हणून कपात करण्यात येत आहे.
वेतन आणि भत्यासंदर्भात अमान्य केलेल्या रक्कमेबाबत आताच सांगता येणार नाही, मी बैठकीत असल्यामुळे याबाबत सांगू शकत नाही.
- एस.बी.कुळकर्णी, शिक्षण उपसंचालक
शिक्षण उपसंचालकांनी अमान्य केलेली रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याची सूचना दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फटका बसला.
- चंदक्रांत गुडेवार, आयुक्त महापालिका