निष्कारण फिरणाऱ्यांत आढळले नऊ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:23+5:302021-04-23T04:13:23+5:30
अमरावती : स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या बेजबाबदार कोविड प्रसारकांच्या शोधासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेने आता ...
अमरावती : स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या बेजबाबदार कोविड प्रसारकांच्या शोधासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. अमरावती शहरात निष्कारण फिरणाऱ्या ३४५ नागरिकांची अँटिजेन चाचणी आज करण्यात आली. त्यात नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. ही मोहीम रोज शहरातील विविध भागांत राबविण्यात येत असून, पॉझिटिव्ह आढळळेल्या व्यक्तींना तत्काळ कोविड केअर केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी पठाण चौक परिसराला भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. उपायुक्त रवी पवार यांनी स्वत: शहरात अनेक ठिकाणी जाऊन पोलीस पथकांच्या मदतीने मोहिमेला चालना दिली. महापालिकेतर्फे शहरातील यशोदानगर, इर्विन चौक, पठाण चौक, जयस्तंभ चौक येथे निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. शहरातील विविध भागांत ही मोहीम रोज राबविण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. असे असतानाही कुठलेही सबळ कारण नसताना शहरात फिरणे चुकीचे आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. तो रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. तिचे पालन काटेकोरपणे झालेच पाहिजे. त्यामुळे कुठलेही लक्षण आढळत असेल तर तत्काळ तपासणी करून घ्यावी व विनाकारण फिरू नये, अशी सूचना मोहिमेद्वारे नागरिकांना वेळोवेळी व ठिकठिकाणी करण्यात आली.
सहायक आयुक्त प्रिया कचरे, भाग्यश्री बोरेकर, डॉ. देवेंद्र गुल्हाने,जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, संजय गंगात्रे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विक्की जैदे यांच्यासह नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
बॉक्स
वेळ न पाळणाऱ्या दुकानांना सील
विलासनगर परिसरातील अरिहंत सुपर बाजार, हनिशा ट्रेडर्स व एकूण तीन गोदामे, तसेच बाबा नारायण शाह जनरल स्टोर्स, रौनक ट्रेडर्स व पलाश लाइनमधील सम्राट कॉस्मेटिक ही दुकाने संचारबंदीत नमूद वेळेनंतरही खुली असल्याचे गाडगेनगर पोलिसांना आढळले. त्यानुसार या दुकानांना पालिकेतर्फे सील करण्यात आले. तसेच बायपासवरील सचिन बारनेही संचारबंदीचे उल्लंघन केल्याच्या फ्रेजरपुरा पोलिसांच्या नोंदीनुसार हा बारही सील करण्यात आला. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पालिकेच्या बाजार परवाना विभागाचे निरीक्षक आनंद काशीकर, संकेत वाघ, अमर सिरवानी, मनोज इटणकर ,सागर आठोर, राहुल वैद्य यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.