दुचाकी फिरवायचे, पेट्रोल संपले की पार्क करायचे; २ अल्पवयीन मुलांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: January 17, 2024 08:08 PM2024-01-17T20:08:39+5:302024-01-17T20:09:34+5:30
दुचाकी चोरीची शक्कल, दोन विधिसंघर्षित बालकांकडून नऊ दुचाकी जप्त
अमरावती : सीसीटीव्हीत दुचाकी चोरताना बंदिस्त झालेल्या दोन विधिसंघर्षित बालकांकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पंचवटी चौक ते कठोरा नाका या परिसरातून दुचाकी चोरी करून ते विधी संघर्षग्रस्त बालक हे त्यातील पेट्रोल संपेपर्यंत वाहन फिरवायचे आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले.
शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने हे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अधिक तपास करीत असताना त्यांनी घटनास्थळा शेजारी सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या फुटेजमध्ये दोन बालक हे काळ्या रंगाची दुचाकी चोरून घेऊन जाताना दिसून येत होते. चौकशीदरम्यान ते स्थानिक शेगाव परिसरातील विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी ती दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
आपण इतर विधी संघर्षग्रस्त बालकांना सोबत घेऊन आणखी काही दुचाकी वाहने चोरल्याची कबुली त्या दोघांनी दिली. त्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन खात्री करण्यात आली तथा त्यांच्या ताब्यातून गाडगेनगरमध्ये दाखल असलेल्या नऊ गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सीपी नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वातील टीम गाडगेनगरने केली.