अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात नऊ हजार हेक्टर बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:21 PM2024-02-13T21:21:08+5:302024-02-13T21:25:24+5:30
विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल ; अवकाळीचा फटका, पिके बाधित .
अमरावती : पश्चिम विदर्भात १० व ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळीचा फटका अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ८७९९ हेक्टरला बसला. या आपत्तीमध्ये खरिपातील तूर, रब्बीचा गहू, हरभरा याशिवाय भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.
यापूर्वी २६ नोव्हेंबर ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान अवकाळीचा फटका विभागाला बसला होता. यामध्ये ११.१० लाख शेतकऱ्यांच्या ६.३२ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी आवश्यक ६७२ कोटींची शासन मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच पुन्हा १० व ११ फेब्रुवारी रोजी विभागातील दोन जिल्ह्यांत अवकाळी व काही ठिकाणी गारपीट झाली. या आपत्तीत काढणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय रब्बीचा गहू जमिनीवर आडवा झाला. सोंगणीवर आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या पथकाद्वारे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली व नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला.
असे झाले नुकसान
१) अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर येथे १० तारखेला गारपीट झालेली आहे. यात २८१५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
२) यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुक्यात २४९४, कळंब तालुक्यात ५५ हेक्टर व उमरखेडा तालुक्यात ३४३५ हेक्टरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला.