अंजनगाव सुर्जीच्या इतिहासात निषादचे देदीप्यमान यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:11 AM2020-12-29T04:11:08+5:302020-12-29T04:11:08+5:30
अमेझॉन, टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या व्यासपीठावर ही बातमी राष्ट्रीय स्तरावर झळकली आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण ...
अमेझॉन, टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या व्यासपीठावर ही बातमी राष्ट्रीय स्तरावर झळकली आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण निषादबाबत तंतोतंत लागू पडते. अगदी सहावी, सातवीपासूनच त्याला इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची गोडी लागली. इतर विद्यार्थी जेव्हा फावल्या वेळात टीव्ही, क्रिकेट, मोबाईलमध्ये रममाण होत वेळ घालवायचे, त्यावेळी निषाद आपला वेळ त्याने तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स लॅबमध्ये घालवायचा. इंटरनेटवरून अधिकाधिक माहिती गोळा करून विविध प्रयोग, नवीन शोधण्याची वृत्ती त्याला यात गुंतवून ठेवायची. सातवी, आठवीपासूनच तो कोणताही बिघडलेला रेडिओ, टीव्ही, टेपरेकॉर्डर चटकन दुरुस्त करायचा. त्याच्या छंदामुळे पुढेही त्याने इलेक्ट्रॉनिक विषयामध्ये करियर करण्याचे ठरविले.
सीताबाई संगई शाळेमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर निषादने नागपूर येथील त्याच वर्षी सुरू झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. सोबतच बेरोजगारांच्या कळपातील एक होण्याऐवजी त्याने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वतःची निसलॅब्ज ( NISLABZ) ही कंपनी स्थापन व नोंदणीकृत केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेससुद्धा तो शिकला. आज त्याच्या विविध शोधांचे पाच पेटंट व त्या प्रॉडक्टच्या ब्रॅण्डनेमचे पेटंट त्याने जर्मनीमध्ये बूक केले आहे. अजून दोन प्रोजेक्टवर त्याचे काम सुरू आहे.
एका प्रोजेक्टकरिता त्याला एका (सोनी) कंपनीने एक टास्क दिला. सध्या जगात उपलब्ध नसलेला संपूर्ण नवीन पद्धतीचा दहा चॅनेलचा पर्सनल लक्झरी ऑडिओ बनविणे खरेच एक आव्हान होते. पण, लॉकडाउनच्या काळातील संचारबंदीमुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेचे त्याने सोने केले. अत्यंत कमी वेळेत म्हणजे चक्क तीन महिन्यांत जगातील एकमेवाद्वितीय असे मॉडेल त्याने (सोनी) कंपनीला बनवून दिले. पर्सनल लक्झरी ऑडिओसाठी निषादनेच दिलेल्या " QUAKE AUDIO " या ब्रॅण्ड नावाने ते मॉडेल ओळखले जाणार आहे. हे मॉडेल त्याच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरले.
निषादची ही उपयुक्तता ओळखून कंपनीने त्याला वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी तब्बल ४४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन कंपनीत एक्झिक्युटिव्ह डिझायनर म्हणून नियुक्ती दिली आहे. भविष्यामध्ये निशादच्या कल्पनेतून साकार झालेली भन्नाट उत्पादने आपल्या सर्वांच्या घराची शोभा वाढविणार आहेत यात शंकाच नाही.
निषादने आजपर्यंत S M Wireless ,Microsoft, Sony, Internships अशा अनेक कंपन्यासोबत कार्य केले आहे. 3D प्रिंटिंग, ॲनिमेशन, कम्प्यूटर गेमिंग यामध्ये त्याला विशेष रस आहे. मुख्य म्हणजे, एकीकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्याने या सर्व गोष्टी साध्य केल्या. सोबतच त्याने रेमंड, मित्रा इंटरनॅशनल या कंपन्यांच्या फोटो शूटमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. मिसिसिपी युनिव्हर्सिटीचा निषाद IOT व एम्बेडेड सिस्टीमचा फॉर्मर इन्टरेन्ससुद्धा आहे. त्याची स्वतःची बेबसाईट असून, जगभरातील अनेक युवा अभियंते तसेच अनेक होऊ घातलेले अभियंते त्याच्या या साइटचे फॉलोअर्स आहेत. अत्यंत करिअरिस्ट अशा शंभर युवा अभियंत्यांची एक क्रू टीम अशाच आव्हानात्मक कार्यामध्ये सतत व्यस्त असते.
खरोखरच निषाद सारखे जगावेगळे विद्यार्थी हे त्या त्या शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या लौकीकमध्ये भर घालत असतात ही बाब खरोखरच अंजनगाव वासीयांसाठी अभिमानाची बाब असून निशादने मिडविलेल्या या दैदीप्यमान यशाचे सर्वत्रकौतुक होत आहे