"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 06:25 PM2024-03-29T18:25:20+5:302024-03-29T18:25:57+5:30

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं.

Nitesh Rane's blood should be tested; Bachu Kadu's 'hit' on BJP leader on amravati loksabha election | "नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

अमरावती - विदर्भातील अमरावतीललोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता महायुतीत वाद निर्माण झाल्याचे उघड झालं आहे. महायुतीतील आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत भूमिका स्पष्ट केली. तसेच, या मतदारसंघातून प्रहारच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणाच कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, बच्चू कडूंचं वादळ थोपवण्यासाठी भाजपा काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच, आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याचा उल्लेख करत बच्चू कडूंना चिमटा काढला. त्यावर, आमदार कडू यांची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.  

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार राणेंच्या टीकेवर आता बच्चू कडू यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलय. "खरतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत. आम्ही सागरातील लाटा आहोत. ते राणेला माहिती नसेल. त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करु नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही अमरावतीपुरतं लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही", अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे. अमरावती येथील पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना कडूंनी राणेंना सुनावलं. 

वर्षा बंगल्यावर बोलला, सागर बंगल्यावर बोलला, हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. धर्म आणि जातीपेक्षा इथे लोकांचे मुद्दे महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे मजूरांचे प्रश्न आहेत. दिव्यांग बांधवांची, विधवा भगिनींचे प्रश्न महत्वाचे आहेत. जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे. मुकबधीर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकू नये, असं यांचं धोरण आहे. महत्वाचे विषय घेऊन आपण लढलं पाहिजे. विषय हद्दपार होता कामा नयेत, असेही कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू वीस वर्षांपासून अपक्ष लढतो. ना झेंडा आहे ना नेता आहे. हमारा नेता मुंबई दिल्लीत बसले नसून आमचा नेता गावात आहे. मी शिंदे साहेबांचा आदर करतो, त्यांनी दिव्यांग मंत्रालय आम्हाला दिलं. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे, भाजप आणि शिंदे साहेबांना वाटलं तर, युतीचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांनी आमच्यावर कारवाई करावी, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: Nitesh Rane's blood should be tested; Bachu Kadu's 'hit' on BJP leader on amravati loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.