Nitin Gadkari: बांधून दाखवला... 5 दिवसांत 75 किमी महामार्ग बनवला, हायस्पीड रस्ते कामाचा वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 10:14 AM2022-06-08T10:14:24+5:302022-06-08T10:16:48+5:30
अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील या वेगवान रस्ते कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे.
नवी दिल्ली/अमरावती - केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं विरोधकही कौतुक करतात. गडकरींच्या कार्यकाळात देशात अनेक राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल आणि मोठ-मोठे रस्ते बाधण्यात येत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेरच्या कामानंतर दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना रोडकरी असं केलं होतं. आता, गडकरींनी पुन्हा एकदा रोडकरी असल्याचं आपल्या कामातून दाखवून दिलंय. अमरावती ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील 75 किमीचा रस्ता केवळ 5 दिवसांत बनवून पूर्ण झाला आहे.
अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील या वेगवान रस्ते कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली. तसेच, हा राष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी ट्विटवरुन म्हटले आहे. गडकरींनी या रोडसाठी काम करणाऱ्या सर्वच घटकांचे आभार मानले आहेत.
Proud Moment For The Entire Nation!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 8, 2022
Feel very happy to congratulate our exceptional Team @NHAI_Official, Consultants & Concessionaire, Rajpath Infracon Pvt Ltd & Jagdish Kadam, on achieving the Guinness World Record (@GWR) of laying 75 Km continuous Bituminous Concrete Road... pic.twitter.com/hP9SsgrQ57
3 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून या कामाला सुरुवात झाली होती. हे काम सलग 110 तास कार्यरत राहिल्याने 75 किलोमीटरपर्यंत लोणी ते माना या गावापर्यंतचा रस्ता केवळ 5 दिवसांत बांधून पूर्ण विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हायस्पीड कामाला निसर्गाचीही साथ लाभली. गेल्या 5 दिवसांत या रस्ते मार्गावर पाऊसानेही दडी मारली होती. त्यामुळे, हे काम शक्य झाले.
अमरावती ते अकोला हा महामार्ग मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून खराब स्थितीत होता. या मार्गाचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते, मात्र हे काम सतत रखडल्यामुळे या मार्गाऐवजी अमरावती ते अकोला प्रवास नागरिक दोन वर्षांपासून दर्यापूर मार्गे बनलेल्या उत्कृष्ट रस्त्यावरून करत होते. महाराष्ट्रातील अतिशय खराब रस्ता म्हणून ओळख असणारा अमरावती अकोला हा मार्ग आता विक्रमी नोंद करून उत्कृष्ट बनला आहे.