नितिन कोरडे यांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:07+5:302020-12-03T04:23:07+5:30
राज्यमंत्र्यांच्या मातोश्रींची उपस्थिती, नगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर, कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती चांदूर बाजार : नगराध्यक्षपदाच्या २७ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत ...
राज्यमंत्र्यांच्या मातोश्रींची उपस्थिती, नगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर, कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती
चांदूर बाजार : नगराध्यक्षपदाच्या २७ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत प्रहार आघाडीचे नितीन कोरडे हे विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर सलग शासकीय सुटल्या आल्याने नितीन कोरडे यांनी १ डिसेंबरला अध्यक्षपदाचा रीतसर पदभार स्वीकारला.
विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू या पदग्रहण सोहळ्याला स्वत: उपस्थित होत्या. त्यांचे आशीर्वाद घेऊनच कोरडे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मातोश्री कडू यांचा नगर परिषदेकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपच्या मागील चार वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या काळातील चित्र यावेळी बदलले. अर्थात यावेळी नगराध्यक्षांच्या कक्षात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे तैलचित्र लावण्यात आले.
मुख्याधिकारी पराग वानखेडे यांच्यासह नगरसेवक अबिद हुसेन, सरदारखाँ शहादतखाँ, स्वीकृत सदस्य सचिन खुळे, नगरसेविका लविना आकोलकर, चंदा खंडारे, वैशाली खोडपे, उषा माकोडे, फातिमा बानो अ. सलीम, जुलेखाबी शेख नजीर व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
--------------
माझ्या कार्यकाळात नगर परिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न राहील. विकासकामांसाठी शासनाकडून व प्रशासनाकडून निधी खेचून आणेल. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत उपस्थितीवर भर दिला जाईल.
- नितीन कोरडे, नगराध्यक्ष, चांदूरबाजार