पतीनेच संपविले नितुला

By admin | Published: May 18, 2017 12:12 AM2017-05-18T00:12:51+5:302017-05-18T00:12:51+5:30

पत्नीचे भाच्याशी असलेले अनैतिक संबध असह्य झाल्याने त्याची मानसिकता ढासळली.

Niyula | पतीनेच संपविले नितुला

पतीनेच संपविले नितुला

Next

सुनियोजित हत्या : ‘क्राईम पॅट्रोल’ पाहून रचला खुनाचा कट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीचे भाच्याशी असलेले अनैतिक संबध असह्य झाल्याने त्याची मानसिकता ढासळली. वारंवार समज देऊनही पत्नी इरेला पेटल्याचे पाहून त्याने विविध वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेगारी मालिकांच्या धर्तीवर नियोजनबद्ध कट आखून पत्नीचा काटा काढला. मात्र, गुन्हा कधीच लपत नाही. अखेरीस तो पोलिसांच्या तावडीत सापडला आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्री तलावात १६ मे रोजी सायंकाळी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. गळा चिरून हत्या केल्यानंतर शरीराला दगड बांधून महिलेला तलावात टाकण्यात आले होते. पोलिसांनी तपासकार्य सुरु करून मृतदेहाची ओळख पटविली. नितू दिलिप इंगोले असे मृत महिलेचे नाव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर सेलमार्फत तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. पोलिसांनी गोळा केलेल्या माहितीवरून महिलेचा पती दिलीप सोबत नेहमीच वाद होत असल्याची बाब स्पष्ट झाली. पत्नीचे भाच्याशी असलेले अनैतिक संबंध हे यावादाचे कारण असल्याची बाबही चौकशीतून पुढे आली.
यामाहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वप्रथम नितुचा पती दिलीप इंगोले याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी हिसका दाखवताच मंगळवारी उशिरा रात्री त्याने नितुच्या हत्येची कबुली दिली. दिलीपने दिलेल्या माहितीनुसार, नितुचे तिचाच भाचा आकाश बागडेसोबत अनैतिक संबध होते. ती अनेकदा त्याच्यासोबत पळूनही गेली होती. त्यामुळे दिलीपच्या मनात पत्नीबद्दल प्रचंड राग धुमसत होता. पत्नीचा काटा काढण्याचे त्याच्या मनात होतेच. याच रागातून त्याने थंड डोक्याने नितुच्या हत्येचा कट रचला व तो अंमलातही आणला. आधी दिलीपने दिलीपने नितुला छत्री तलाव येथे नेऊन तिचा सत्तुरने गळा कापला. त्यानंतर तीच्या मृतदेहाला दगड बांधून पाण्यात फेकून दिला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे कांचन पांडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देसाई, गावंडे, पोलीस उपनिरीक्षक राम गीते, राजेंद्र चाटे व एएसआय विधाते यांच्या पथकाने २४ तासांच्या आता या हत्या प्रकरणाचा उलगडा केला.

आकाशसह मित्राची कसून चौकशी
अमरावती : दिलीपच्या बहिणीचा मुलगा आकाश हा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरून नितुला कॉल करीत होता.
नितुच्या ‘कॉल डिटेल्स’वरून ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पोलिसांनी आकाशसह त्याचा मित्र सलमान कुरैशी व एका अल्पवयीनाला नागपूरवरून ताब्यात घेऊन चौकशीकरिता अमरावतीत आणले होते. पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत.

बांधकाम कामगारांची चौकशी
दिलीपने पत्नीची हत्या करताना कोणाची मदत घेतली का, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. दिलीप बांधकाम कामगार असून त्याने त्याच्या मित्रांची मदत घेतली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस त्याच्या मित्रांचीही चौकशी करणार आहेत.

अनैतिक संबंधाचा भयावह अंत
फे्रजरपुऱ्यातील रहिवासी दिलीप इंगोले याच्या भावाच्या लग्नात त्याच्या बहिणीचा मुलगा आकाश उपस्थित होता. त्यावेळी आकाशचे मामी नितू इंगोले सोबत प्रेमसूत जुळले. काही दिवसांनी आकाश व नितू हे दोघेही नागपुरला गेले. आकाशच्या शेजारीच राहणाऱ्या मित्रांच्या मदतीने दोघेही बालाघाट येथे सुद्धा काही दिवस मुक्कामी होते. दरम्यान दिलीपने पत्नीचा शोध घेऊन बालाघाटहून तिला परत आणले आणि तिची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु केले. नितू आकाशच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. यावरून पती-पत्नीत अनेकदा जोरदार वादही झाला. त्यामुळे नितू तिच्या बहिणीच्या घरी निघून गेली होती. हा प्रकार कळताच बहिणीने सुद्धा तिला घरी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे नितू व तीची आई हे दोघेही हमालपुरा भागात भाड्याने खोली करून राहू लागले. नितू ही नमुना परिसरातील एका कापड प्रतिष्ठानात नोकरी करून उदरनिर्वाह करू लागली. तिला दिलीप इंगोलेपासून दोन मुली आहेत. दिलीप दररोज मुलींना नितूच्या भेटीसाठी घेऊन जात असे व तिला समजविण्याचा प्रयत्न करीत असे. मात्र, तरीही नितू ऐकत नसल्याचे पाहून दिलीपने तिच्या हत्येचा कट रचला. ११ मे रोजी सायंकाळी दिलीपने दुचाकीच्या डिक्कीत सत्तूर ठेवला आणि तिला राजकमल चौकात बोलविले. आकाशजवळ सोडून देण्याचा बहाणा करून त्याने तिला सर्वप्रथम नागपूर मार्गावर गेले. तेथून तपोवनमार्गे ते छत्री तलावावर पोहोचले. तलावाच्या काठावर बसून दोघेही गप्पा करीत असताना सुद्धा नितू वारंवार आकाशचे नाव घेत असल्याचे पाहून दिलीपचा राग अनावर झाला आणि त्याने सत्तुरने तिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर तिला तलावाच्या काठावर ओढत नेऊन ओढणीच्या सहाय्याने तिच्या शरीरावर दगड बांधले आणि तिला छत्री तलावात फेकून दिले.

कपडे जाळून पुरावे केले नष्ट
छत्री तलावात नितुचा मृतदेह फेकण्यापूर्वी दिलीपने तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून घेतले. घरी जाऊन त्याने नितुसह व स्वत:चे कपडे जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिलिपने पोलिसांना दिली.

क्राईम पॅट्रोल मालिकेचा शौकीन
एका वाहिनीवरून प्रदर्शित होणाऱ्या ‘क्राईम पॅट्रोल’ ही गुन्हेगारी मालिका पाहण्याची आवड दिलीप इंगोलेला होती. ही मालिका पाहूनच त्याने नितुच्या हत्येचा कट रचला. दिलीप हा पत्नीच्या मोबाईलमधून ‘कॉल डिटेल्स’ घेऊन एका कागदावर लिहून ठेवत होता. त्याने तशी माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. गुन्हेगारी मालिकांमधूनच खुनाचा कट रचल्याचेही त्याने पोेलिसांना सांगितले.

दिलीपच्या प्रेयसीचे घर बंद
दिलीपने अनैतिक संबधातून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.चौकशीदरम्यान दिलीपचेही एका महिलेशी प्रेमसंबध असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या प्रेयसीची चौकशी करण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले असता घराला कुलूप आढळून आले. याघटनेशी दिलिपच्या प्रेयसीचा काही संबध आहे का, ही बाब पोलीस तपासून पाहणार आहेत.

 

 

Web Title: Niyula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.