मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले
By गणेश वासनिक | Published: June 5, 2023 06:02 PM2023-06-05T18:02:22+5:302023-06-05T18:05:37+5:30
एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या; वन्यजीव, जंगलाचे संरक्षण वाऱ्यावर
अमरावती : वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांचे प्रकरण मंत्रालयात घोंगावत असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातृून एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह जंगल संरक्षणाबाबतचे कामकाज रेंगाळले आहे.
मेळघाट प्रादेशिक अंतर्गत चिखलदरा येथील वनप्रशिक्षण संस्थेतील सहायक वनसंरक्षक मच्छिंद्र थिगळे यांची पांढरकवडा, मेळघाट वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक विद्या वसव यांची यवतमाळ संशोधन, परतवाडा वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक ईंद्रजित निकम यांची कोल्हापूर तर सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमशेल पाटील यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. तथापि, मेळघाटातून सहायक वनसंरक्षकांची बदली करताना त्या जागेवर नव्याने एसीएफ पदावर अधिकारी नियुक्त केले नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाची कामे संबंधित सहायक वनसंरक्षकांविना कशी करावी, हा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.