सुंदर गावांना ना प्रमाण, ना पारितोषिकाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:37+5:302021-08-18T04:18:37+5:30
अमरावती : आर.आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील १७ गावांना काही महिन्यांपासून ना पुरस्काराची ...
अमरावती : आर.आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील १७ गावांना काही महिन्यांपासून ना पुरस्काराची रक्कम मिळाली, ना प्रमाणपत्र त्यामुळे ही गावे आपल्या हक्काच्या पारितोषिकांच्या प्रतीक्षेत आहेत. यात जिल्हास्तरावरील २ आणि तालुकास्तरावरील १५ गावांचा यात समावेश आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केल्या. त्यांच्या योगदानाची दखल घेत स्मार्ट ग्राम योजनेला त्यांचे नाव देण्यात आले. लोकसहभाग आणि समन्वयातून हा योजनेला चालना देण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. पुरस्कार मिळविणाऱ्या गावांना जिल्हास्तरावर ४० लाख आणि तालुकास्तरावर १० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गावाची स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विभागनीत एकूण शंभर गुणांच्या आधारे गुणांकन होते. वर्ष २०१९-२० च्या पुरस्कार प्राप्त गावांची नावे निश्चित करण्यात आली. या गावांना पुरस्काराचे वितरण आबा पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी १६ फेब्रुवारी रोजी केले जाते. परंतु कोरोनामुळे योजनेत जिल्हा व तालुकास्तरावर बाजी मारलेल्या १७ गावांना अद्यापही शासनाकडून गौरवाचे प्रमाणपत्र आणि पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही.
बॉक्स
या गावांची झाली होती निवड
सुंदर गाव ग्रामपंचायत म्हणून जिल्हास्तरावर अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा, चांदूर बाजारमधील गोविंदपूर, आणि तालुकास्तरावरील गावांमध्ये अमरावती तालुक्यातील रेवसा, भातकुली - सोनारखेडा, नांदगांव मधील- पुसनेर, मोखड, तिवसा-जावरा, मोर्शी -लेहगांव, वरूड - सावंगा, अंजनगाव सुर्जीतील कापुसतळणी, धारणी- दुनी, चिखलदरा-गौलखेडा बाजार, चांदूर बाजार गोविंदपूर, दर्यापूर - शिंगणापूर, अचलपूर - सावळी दातुरा, चांदूर रेल्वे सावंगी संगम, धामणगाव रेल्वेमधील कामनापूर घुसळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.