सुंदर गावांना ना प्रमाणपत्र, ना पारितोषिकांची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:19+5:302021-08-19T04:16:19+5:30
अंजनगाव सुर्जी : आर.आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील जवळपास १७ गावांना मागील काही ...
अंजनगाव सुर्जी : आर.आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील जवळपास १७ गावांना मागील काही महिन्यापासून ना पुरस्काराची रक्कम मिळाली, ना प्रमाणपत्र. या गावांना हक्काच्या पारितोषिकांची प्रतीक्षा लागली आहे. यात जिल्हास्तरावरील दोन आणि तालुकास्तरावरील १५ गावांचा समावेश आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केल्या. त्यांच्या योगदानाची दखल घेत स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे. लोकसहभाग आणि समन्वयातून हा योजनेचा चालना देण्याने राज्य शासनाचे नियोजन आहे. पुरस्कार मिळविणाऱ्या गावांना जिल्हास्तरावर ४० लाख आणि तालुकास्तरावर १० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गावाचे स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विभागणीत एकूण शंभर गुणांच्या आधारे गुणांकन होते. वर्ष २०१९-२० च्या पुरस्कार प्राप्त गावांची नावे निश्चित करण्यात आली. या गावांना पुरस्काराचे वितरण आर.आर. आबा पाटील यांच्या पुण्यतिथीला म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी केले जाते. परंतु, कोरोना संसगार्मुळे योजनेत जिल्हा व तालुकास्तरावर बाजी मारलेल्या १७ गावांना अद्यापही या ग्रामपंचायतींना शासनाकडून गौरवाचे प्रमाणपत्र व पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही.
बॉक्स
या गावांची झाली होती निवड
सुंदर गाव, ग्रामपंचायत म्हणून जिल्हास्तरावर अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा, चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर यांची निवड झाली आहे. तालुकास्तरावरील गावांमध्ये अमरावती तालुक्यातील रेवसा, भातकुली तालुक्यातील सोनारखेडा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, मोखड, तिवसा तालुक्यातील जावरा, मोर्शी तालुक्यातील लेहगाव, वरूड तालुक्यातील सावंगा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी, धारणी तालुक्यातील दुनी, चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार, चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर, दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर, अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापूर घुसळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.