एकही बालक योग्य संगोपनापासून वंचित राहता कामा नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:06+5:302021-06-05T04:10:06+5:30
यशोमती ठाकूर यांचे निर्देश, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण व संगोपन अमरावती : कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या ...
यशोमती ठाकूर यांचे निर्देश, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण व संगोपन
अमरावती : कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे, यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे एकही मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.
अनाथ बालक संगोपन टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी आ. सुलभा खोडके, आ. बळवंत वानखडे, आ. प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकूर यांनी कोविड साथीच्या काळात बालकाला संरक्षण, संगोपनाबाबत कुठलीही समस्या येत असेल, तर त्याचे तात्काळ निराकरण होणे व त्यांना योग्य निवारा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न व्हावेत. लोकप्रतिनिधी, विविध संस्था यांचे सहकार्य मिळवून बाल संरक्षण कक्षाद्वारे अनाथ बालकांना संगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. कोरोनाकाळात इतरही आजारांनी पालक दगावले असतील, तर तशा अनाथ बालकांचीही माहिती गोळा करून त्यांच्याही योग्य संगोपनाच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी. दोन्ही पालक नसलेली अनाथ बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने अशा बालकांचा सर्वदूर शोध घ्यावा. एकही अनाथ मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यात कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेली १६६ बालके आहेत. त्यात दोन्ही पालक मृत्यू पावलेली आठ बालके आहेत. त्यांना संगोपन योजनेचा लाभ किंवा आवश्यकतेनुसार संस्थेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया होत आहे. नागरिकांनीही अशा बालकांबाबतची माहिती चाईल्ड लाईन १०९८ वर कळवावी, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले. यानिमित्त जनजागृती पत्रकाचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
०००