भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:01 PM2024-07-06T13:01:14+5:302024-07-06T13:01:56+5:30
Amravati : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग असल्याने गतवर्षी पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पिकांचे नुकसान झाले असतानाही कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही. त्याचा फटका यंदा बसल्याचे दिसून येत आहे. मुदत संपण्याला फक्त १० दिवस बाकी असताना केवळ एक लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी घेता येतो. गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५.१० लाख अर्जाद्वारे या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावर्षी सुद्धा अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात यंदा शेतकऱ्यांचा सध्या फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.
विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकरी स्वतः केंद्र सरकारच्या विमा पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये बचत खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत ही विमा योजनेत सहभागी होता येते शिवाय सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो, असे कृषी विभागाने सांगितले.
योजनेत शेतकरी सहभागाची सद्यस्थिती
कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज - १५६४
गैरकर्जदार शेतकरी सहभाग - ३५६९
५ जुलैपर्यंत शेतकरी सहभाग - ९५१३३
गतवर्षी तुलनेत सध्या सहभाग - १८.६६
गतवर्षी सहभागी शेतकरी संख्या - ५,०९,५४५
गतवर्षीच्या परताव्यासाठी शेतकरी संतप्त
● गतवर्षी बाधित पिकांसाठी तब्बल १६९५६३ पूर्वसूचना कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १,१२,६०४ सूचना (६६.४० टक्के) कंपनीद्वारा नाकारण्यात आल्या. शिवाय फेर तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कंपनीद्वारा पालन नाही.
● कंपनीकडे शेतकरी हिस्सा, राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा असे एकूण ३८२.३५ कोटी जमा झाले. तुलनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ३७.५० कोटी, प्रतिकूल हवामान ९.३८ कोटी, काढणीपश्चात २.८३ कोटी, असा एकूण ४८.७७ कोटींचा परतावा देण्यात आला आहे.
गतवर्षीच्या परताव्यासाठी पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यंदाही एक रुपयात सहभागी होता येत असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा. या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळते
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी