जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 21, 2024 09:50 PM2024-02-21T21:50:52+5:302024-02-21T21:51:01+5:30

विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर विभागीय सहनिबंधकांचा निर्णय

No-confidence motion against five directors of Zilla Bank rejected | जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

अमरावती: जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तारूढ गटाच्या पाच संचालकांविरुद्ध विरोधी गटाने केलेली अविश्वास प्रस्तावाची मागणी विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांनी बुधवारी फेटाळली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विषयाच्या अनुषंगाने विशेष सभा नाकारली आहे. त्यामुळे विरोधकांचा बार फुसका ठरला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू आहेत. त्यांच्या गटातील नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पटेल, आनंद काळे, अजय मेहकरे व चित्रा डहाणे यांनी बँकेच्या हिताविरुद्ध कामकाज केल्याने त्यांच्याविरुद्ध विरोधी गटाच्या १४ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणून निष्कासित करण्याच्या मागणीसाठी अर्ज विभागीय सहनिबंधकांकडे १२ फेब्रुवारीला केला होता. या प्रस्तावामधील आरोपांची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ यांना कळविले होते. हा अहवाल विभागीय सहनिबंधकांना २० फेब्रुवारीला प्राप्त झाला. विरोधी गटाच्या संचालकांद्वारे दाखल मुद्दे कायद्याच्या पातळीवर पडताळणी करण्यात आले. अहवालामध्ये ‘त्या’ पाच संचालकांवरील प्रत्येक आरोपाची पडताळणी करून हा अहवाल देण्यात आला आहे. काही आरोपांमध्ये स्पष्टता व काहींमध्ये तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्याने विभागीय सहनिबंधकांनी हा अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे.
--------------------------------
म्हणून अविश्वास प्रस्ताव विधिसंमत नाही
कायद्यातील तरतुदीनुसार ज्या संचालकांना आपण निवडून दिलेले नाही, त्या संचालकांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणे विधिसंमत होत नसल्याचे मत विभागीय सहनिबंधकांनी नोंदविले, शिवाय सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असलेल्या सभासदांची संपूर्ण नावे व पत्तादेखील अर्जाला जोडले नसल्याचे मत यामध्ये नोंदविण्यात आले आहे.
-------------------------------
विरोधी गटाचे दोन संचालक आता टार्गेट
१) जिल्हा बँकेतील विरोधी गटाचे संचालक प्रकाश बाबाराव काळबांडे व अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्यासाठी एक जण न्यायालयात प्रकरण दाखल करीत असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी दिली.
२) काळबांडे ज्या संस्थेचे सभासद आहेत, तेथे उपविधीमध्ये दुरुस्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते व देशमुख यांनी अध्यक्ष असताना पदाचा दुरुपयोग करीत निर्णय घेतल्याचा आरोप ढेपे यांनी केला.
---------------------
विरोधकांच्या प्रत्येक आरोपाची कायद्याच्या कसोटीवर तपासणी करून विभागीय सहनिबंधकांनी हा निर्णय दिला. त्याचे आम्ही स्वागत करतो. विरोधक आता हताश झाल्याचे दिसून येत आहे.- अभिजित ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

Web Title: No-confidence motion against five directors of Zilla Bank rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.