नाही खर्चाला र्मयादा, ना ईव्हीएम, नोटा
By admin | Published: May 31, 2014 11:10 PM2014-05-31T23:10:50+5:302014-05-31T23:10:50+5:30
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून २0१४ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण अनुभवल्या असल्या
पसंतीक्रम : शिक्षक निवडणूक जरा ‘हटकेच’
अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून २0१४ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण अनुभवल्या असल्या तरी ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आपल्याला जरा ‘हटके’ वाटल्याशिवाय राहणार नाही.
या निवडणुकीत आचारसंहिता तीच आहे. मात्र आचारसंहितेचा बागूलबुवा नाही. लोकसभा निवडणुकीत खर्चाची र्मयादा ८0 लक्ष रूपये होती. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खर्चाची र्मयादा नाही. अद्याप तरी आयोगाने याविषयी काहीच स्पष्ट केलेले नाही. केवळ उमेदवारी दाखल करताना १0 हजार रूपये भरावे लागतात. या व्यतिरिक्त तूर्तास कुठलाही खर्च निर्धारण आयोगाने केलेला नाही.
या निवडणुकीत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिका राहणार आहे व त्यावर मतदानाचा शिक्का मारण्याऐवजी मार्कर पेन द्वारा उमेदवाराच्या पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या पसंतीच्या क्रमानुसार मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र व टपाली मतपत्रिका यावर नोटा (नकारार्थी मत) चे मतदान करायचा हक्क होता. परंतु या शिक्षक मतदारसंघात नकारार्थी मत राहणार नसल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे. विभागाचे मुख्यालय, तसेच या निवडणुकीत सर्वाधिक मते अमरावती जिल्ह्यातील असल्याने व सर्वाधिक मतदान केंद्रदेखील अमरावतीतच असल्याने मतमोजणी ही २४ जूनला अमरावती येथेच होणार आहे. मात्र मतमोजणी कुठे होईल याविषयी आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले नाही. नामांकन अर्ज ३ जून २0१४ पर्यंत स्वीकारले जाणार आहे. या मतदारसंघात ४४ हजार ६५४ मतदार आहे. अद्यापही मतदारांची नावनोंदणी सुरू आहे. यासाठी ४ जून ही शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले.