गोहत्या नाहीच !
By admin | Published: February 1, 2015 10:46 PM2015-02-01T22:46:43+5:302015-02-01T22:46:43+5:30
मांस विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या कुरेशी समाजाने गोहत्या बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. आता गार्इंची कत्तल करुन कोणीही मांस विकणार नाही, असा निर्णय येथील अल जमेतूल कुरेश वेलफेअर
कुरेशी समाजाचा निर्णय : १० हजार रुपये दंड, महिनाभर मांस विक्रीला लगाम
गणेश वासनिक - अमरावती
मांस विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या कुरेशी समाजाने गोहत्या बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. आता गार्इंची कत्तल करुन कोणीही मांस विकणार नाही, असा निर्णय येथील अल जमेतूल कुरेश वेलफेअर सोसायटीने घेऊन हिंदू समाजाच्या भावना जोपासल्या आहेत. कुणी गाईची कत्तल केल्यास त्यांच्याविरुद्ध कुरेशी समाज पोलिसात धाव घेईल. एवढेच नव्हे तर संबंधितांना १० हजार रुपये दंड तर महिनाभर मांस विक्रीला लगाम राहिल, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोचणार नाही, दुसरीकडे कुरेशी समाजाला नियमानुसार मांस विक्री करणे सुलभ होणार आहे.
केंद्र शासनाने यापूर्वीच गोहत्याबंदी केली आहे. हिंदू समाजाच्या विविध संघटनांची गोहत्याबंदीची मागणी सातत्याने होत आहे. गोहत्या करुन मांस विक्री केली जाते, अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदूत्ववादी संघटनांची आहे.
हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी गार्इंची वाहतूक करीत असताना व्यावसायिकांना रंगेहात पकडून ही वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. यावर कुरेशी समाजाने हा निर्णय घेतला आहे.
मांसाची वाहतूक कोण रोखणार?
अमरावती येथील यांत्रिकी कत्तलखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. मात्र उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात जनावरांच्या कत्तलीसाठी स्थानिक मांस विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहे. नेमकी ही बाब हेरुन काही मांस विके्रत्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला व्यवसायाचे स्वरुप दिले आहे. अमरावती येथून मुंबई, औरंगाबाद, नांदेड व हैद्राबाद आदी प्रमुख शहरांत जनावरांची कत्तल करुन मांसाची निर्यात केली जात आहे. परंतु उच्च न्यायालयाने जो आदेश दिला तो स्थानिक विक्रेत्यांसाठी असून बाहेरगावी मांस विक्रीसाठी नाही. त्यामुळे हा अफलातून प्रकार रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
विदर्भात 'या' निर्णयाची अंमलबजावणी सुरु
कुरेशी समाज हा विदर्भभर वात्सव्याला आहे. गार्इंच्या कत्तलीमुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता कोणीही गार्इंची कत्तल करुन मांस विक्री करु नये, या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता विदर्भात कुरेशी समाजात जनजागृती केली जात आहे. मांस विक्रे त्यांनीदेखील संघटनेच्या निर्णयाला मान्यता देऊन गाईचे मांस विकणार नाही, असे ठरविले आहे. परिणामी जनावरांच्या बाजारपेठेत कोणताही व्यवसायिक शेतकऱ्यांकडील गाय खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र नाही.