इ-वे बिल नाही, सुपारीच्या वाहनाला १० लाखांचा दंड
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2024 02:42 PM2024-04-26T14:42:39+5:302024-04-26T14:45:06+5:30
अमरावती लोकसभा : नांदगाव नाक्यावर जीएसटी विभागाच्या पथकाची कारवाई
अमरावती : ई-वे बिल नसणाऱ्या वाहनांवर १० लाखांपेक्षा जास्त दंडाची कारवाई येथील जीएसटी विभागाच्या पथकाने नांदगाव टोल नाक्यावर कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदगाव टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती येथील राज्यकर जीसटी विभागाचे पथकाने तीन दिवस वाहन तपासणी मोहीम राबविली.
निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन म्हणून देण्यात येण्याऱ्या भेटवस्तू तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी निर्देश दिले होते. या मोहिमेत जीएसटी विभागाचे १० अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे. त्याद्वारे एक हजारावर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत राजेश चेचेरे, वृषाली देशमुख, आकाश जैस्वाल, नीलिमा आटे आदींनी सहकार्य केले.
या मोहिमेत अमरावती कार्यालयाचे संदीप ठाकरे, विनोद इंगळे, अप्पासाहेब देशमुख, अंकुश देशमुख, निलेश क्षीरसागर, जयंत उमप, प्रफुल गावंडे, वैशाली हरणे, शिल्पा पाटील, स्वाती दैने, पल्लवी नेरकर, प्रज्ञा गेडे, प्रिया भाले आदी अधिकारी सहभागी असल्याचे जिल्हा नोडल अधिकारी उज्वल देशमुख यांनी सांगितले. यापुढेही कठोर कारवाही करण्यात येणार असल्याचे विभागीय राज्यकर सहआयुक्त संजय पोखरकर यांनी सांगितले. आचार संहितेच्या काळात विभागात २५ लाख दंड वसूल करण्यात आलेला आहे. या कारवाईचे संनियंत्रण राज्य कर सहआयुक्त, विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रामदास गडपायले, योगेश आढाव, राजेश दुधे व प्राजक्ता चौधरी करीत आहेत.
दिल्लीला नव्हे अहमदाबादला जात होती सुपारी
कारवाईत ट्रकमधील सुपारी दावणगिरी (कर्नाटक) वरून दिल्लीला जात असल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात हा माल नागपूर येथून अहमदाबाद येथे जात असल्याचे ट्रक चालकाचे बयान आहे. मालाची किंमत ३२ लाख रुपये दाखविण्यात आली असली तरी बाजारभावानुसार एक कोटींवर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित व्यापारी व ट्रान्सपोर्टरवर २०० टक्के दंडाव्यतिरिक्त जीएसटी कायद्यातील कलमानुसार कारवाही करण्यात आल्याचे पथक अधिकारी प्रिया भाले यांनी सांगितले.