स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:18 PM2023-01-18T14:18:29+5:302023-01-18T14:23:24+5:30
तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही
धारणी (अमरावती) : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील रंगूबेली गावात स्वातंत्र्यानंतर वीज तर पोहाेचली नाही; परंतु, तीन महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन किलोमीटर अंतरावरील तापी नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यलयावर धडक दिली व याबाबत निवेदन दिले.
विजेच्या समस्येतून नागरिक अद्यापही सुटले नाही. गावात कसाबसा सौरउर्जेचा आधार घेत फक्त मोक्याच्या ठिकाणी सौर कंदील लावण्यात आले त्यालाही भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याने तेसुद्धा बंद पडले आहे. त्यामुळे गावात अंधार कायम आहेच, त्यासोबत नव्याने आणखी पाणीटंचाईची मोठी समस्या नागरिकांसमोर उभी झाली. तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीपात्रातून पिण्याचे व वापरायचे पाणी आणावे लागत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार दिल्या; परंतु, त्यांनी तांत्रिक अडचणींचा आधार घेत याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंटाळलेला नागरिकांनी मंगळवारला दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धाव घेऊन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांना निवेदन दिले. त्यावर ते काय करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पाणी पुरवठ्याची विहीर १० फूट उंच
गावातील विहीर दुरुस्तीचे काम चालू असून त्या ठिकाणी जुन्या विहिरीवर अंदाजे १० ते १५ फूट लांब बांधकाम केले आहे. अधिकारी, ठेकेदार यांनी जमिनीपासून बांधकाम केले नाही, विहिरीवर १० फूट बांधकाम केल्याने १० फूट उंच चढून पाणी ओढणे महिला व वृद्धांना शक्य नाही. त्या विहिरीचा मोबाइलमध्ये फोटो दाखवून, सांगा साहेब पाण्याची बकेट कशी ओढू, असा सवाल गावकऱ्यांनी एसडीओ यांना केला.
आरोग्यास धोका
तापी नदीपात्रातील पाणी आम्ही गावकरी पित आहे. त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढावी, अन्यथा आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.