नव्या आरोग्य केंद्रांना ना निधी, ना जागा
By admin | Published: January 15, 2015 10:42 PM2015-01-15T22:42:36+5:302015-01-15T22:42:36+5:30
राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध
अनावस्था : जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३५ उपकेंद्रांचे भिजत घोंगडे
जितेंद्र दखने - अमरावती
राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये काही ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी जागा मिळत नसल्याने प्रस्ताव रखडले आहेत. दुसरीकडे यासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्र उभारण्याची शक्यता धुसर होण्याची चिन्हे अधिक आहेत.
जिल्ह्यातील १४ पैकी बारा तालुक्यांत सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३५ आरोग्य उपकेंद्र शासनाने मंजूर केले आहेत. यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी जागा व निधीअभावी ही कामेच ठप्प आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. परंतु यश अद्याप मिळालेले नाही. यावर जि.प.च्या सभेत पदाधिकारी व सदस्यांनी आवाज उठविला. मात्र लोकप्रतिनिधीना यश आले नाही. अशातच एनआरएचएमचे अनुदान रखडल्यामुळे याचा परिणाम आरोग्य केंद्रावर झाला आहे.
आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांना बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने अडचणीत भर पडली आहे. ेअशातच ग्रामपंचायतींकडून जागा उपलब्ध होत नाहीत. जेथे जागा उपलब्ध आहेत तेथे जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही जागेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही अन निधीचाही पत्ता नाही, अशा विविध समस्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे संकटात सापडली आहेत.