शासन मंजुरी नाही, वेतन नाकारले तरीही ‘डीन’पदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:30+5:302021-06-16T04:16:30+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी यांच्या पदाला शासनमान्यता नाही. व्यवस्थापन परिषदेने ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी यांच्या पदाला शासनमान्यता नाही. व्यवस्थापन परिषदेने वेतन नाकारले आहे. असे असताना ते ‘डीन’पदी कायम असल्याचा अफलातून प्रकार विद्यापीठात सुरू आहे. तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मेहरबानीने रघुवंशी यांचा ‘डीन’पदाचा प्रवास अविरतपणे सुरूच आहे.
तत्कालीन कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात आला. कुलगुरू प्रभारी पदाची सूत्रे
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी १ जून रोजी स्वीकारली. मात्र, अधिष्ठाता रघुवंशी यांचा वेतन देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने नाकारला आणि राज्य शासनाच्या निर्णयार्थ पाठविण्यात आला. परंतु, रघुवंशी यांना मे महिन्याचे वेतन जून महिन्यात देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. एफ.सी.रघुवंशी यांची डीनपदी नियुक्ती करताना ते पात्र नसताना कशासाठी नियुक्ती करण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. डीनपदी नियुक्तीच्यावेळी प्राचार्यपदी कायम असणे नियमावली आहे. मात्र, रघुवंशी यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते ‘डिसकनेक्ट’ झाले होते. तरीही तत्कालीन कुलगुरू चांदेकर यांनी सन २०१८ मध्ये रघुवंशीची नियुक्ती केली. शासनाने रघुवंशी यांच्या पदाला मान्यता दिली नाही. त्यामुळे वेतन देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतली आहे. प्रभारी कुलगुरू भाले यांनी विद्यापीठाचा कारभार हाताळण्यास प्रारंभ केल्यानंतरही रघुवंशी हे ‘डीन’पदी कायम असणे एक आश्चर्य मानले जात आहे.
-------------------
रघुवंशी यांच्या वेतनाचा प्रस्ताव शासनाकडे
एफ.सी. रघुवंशी यांना दोन वर्षाचे अधिष्ठातापदाचे ७२ लाखांचे वेतन विद्यापीठाला अदा करावे लागणार आहे. तथापि, व्यवस्थापन परिषदेने ७२ लाखांचे वेतन देण्यास नकार दर्शविल्याने ते शासन निर्णयार्थ पाठविण्यात आले आहे. आता हा वेतनाचा मुद्दा राज्याच्या वित्त विभागाकडे निर्णयार्थ असून, हे वेतन त्वरेने काढण्यात यावे, यासाठी रघुवंशी हे स्थानिक पुढाऱ्यांकडे वारी करीत असल्याची माहिती आहे.
------------------
प्रभारी कुलगुरुंना ‘डीन’पदी नियुक्तीचा अधिकार आहे का?
प्रभारी कुलगुरू विलास भाले यांनी अमरावती विद्यापीठाचा पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाने डीन रघुवंशी यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले. तरीही प्रभारी कुलगुरुंनी रघुवंशी यांना कशाच्या आधारे पुन्हा डीनपदी नियुक्ती दिली, हा संशोधनाचा विषय आहे. विद्यापीठ कायद्यानुसार प्रभारी कुलगुरूंना डीनपदी नियुक्तीचे अधिकार नाही, अशी माहिती आहे.