अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:11 AM2020-03-11T11:11:59+5:302020-03-11T11:12:25+5:30

दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावात होळी पेटविली जात नाही.

No Holi or Rangpanchami in Pimpalod village in Amravati district for 69 years! | अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !

अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अनंत बोबडे
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. पंचक्रोशीत महाराजांचे अनेक चमत्कार लोकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला त्यांनी देह ठेवला. त्यामुळे या गावात होळी पेटविली जात नाही. रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही. या घटनेला आज ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
दर्यापूर तालुका खारपाणपट्टा आहे. मात्र, महाराजांनी त्याकाळी जलस्त्रोत दाखवून गोड पाण्याने गावकऱ्यांची तहान भागविली. आजही पाण्याचा अखंड झरा ओसंडून वाहत आहे. अशा एक नव्हे, अनेक कथा गावकरी सांगतात. लोकसहभागातून महाराजांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या मंदिरात महाराजांसोबत श्री दत्त व भगवान गौतम बुद्धाची तेजोमय मूर्ती विराजमान आहे.
श्री दत्त जयंतीला भव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते. होळी पौर्णिमा यात्रा गावात आयटीआयनजीक परशरामनगर येथे व जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमेला श्री संत परशराम महाराज जलकुंड (झरा) येथे साजरे केले जातात. होळीच्या दिवशी दिवसभर मंदिरात मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. अत्यंत विलोभनिय रोषणाईने आयटीआय येथील मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. रंगपंचमीचे दिवशी संत परशराम महाराज यांचे जयघोषात दिंड्या, पताका व वारकरी पावली खेळत ‘श्रीं’च्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा काढतात. महिला सडा, रांगोळ्या काढून व दिवे लावून रस्ता सजवतात. आयटीआयमधील मंदिरात काल्याचे कीर्तन केले जाते. दहीहंडी फोडली जाते व नंतर महाप्रसाद वितरित केला जातो, अशी माहिती आयटीआयचे गटनिदेशक अनिलकुमार गावंडे यांनी दिली. ॉकार्यक्रमाचे आयोजन पिंपळोद आयटीआयचे प्राचार्य राजेश वाघजाळे, निदेशक व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ करतात.


महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सगळीकडे होळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु पिंपळोद येथे ६९ वर्षांपासून कुणीही होळी खेळले नाही. पिंपळोद येथे परशराम महाराज यांनी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी पेटत नाही. सण साजरा करण्यात येत नाही.
- देवकन्या भगत, सरपंच, पिंपळोद
 

Web Title: No Holi or Rangpanchami in Pimpalod village in Amravati district for 69 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी