राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:18 AM2023-12-28T05:18:11+5:302023-12-28T05:19:18+5:30
सत्ताधारी पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही. केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा ते फोकस करीत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत असले तरी मला त्याचे निमंत्रण नाहीच, तसेही मी मंदिरात जात नाही, पूजाअर्चा हा वैयक्तिक भाग आहे. काही स्थाने आहेत. तेथे मी जातो, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी बुधवारी अमरावती येथे पत्रकार परिषदेत केली.
पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही. केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा ते फोकस करीत आहेत. संसदेत बाहेरील लोक घुसतात, गॅस आणतात. याची माहिती सरकारकडे मागणे, हा काही गुन्हा नाही. पण, प्रश्न विचारू नका, हाच केंद्र सरकारचा अजेंडा आहे. म्हणून १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले.
इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही. जागा वाटप अद्यापही झाले नाही; पण आघाडी एकसंघ राहील, यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने शरद पवार सन्मानित
श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा दिला जाणारा पहिला ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ शरद पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या १२५ रुपयांच्या नाण्याचे विमोचन यावेळी गडकरी व पवार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पवार यांना प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.