ग्रामीण भागात ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:09+5:302021-05-18T04:13:09+5:30
मोर्शी : कोरोनाने ग्रामीण भागात वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात गत तीन दिवसांपासून १०० चे वर रोज ...
मोर्शी : कोरोनाने ग्रामीण भागात वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात गत तीन दिवसांपासून १०० चे वर रोज रुग्ण निघत असले तरी ग्रामीण भागातील तरुणांना याचे फारसे गांभीर्य नाही. अनेक नागरिक दुखणे अंगावर काढत असून, दवाखान्यात दाखल केले जाण्याच्या भीतीने कोविड चाचणीपासून पळ काढत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर अदृश्य रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे तरुणांचा देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशातील तरुण कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याऐवजी बेजबाबदार वर्तनाने ही साथ वाढविण्याला हातभार लावत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण निघत असले तरी येथील तरुण ना मास्क लावतात, ना फिजिकल डिस्टन्स पाळताना दिसत आहेत. खरे म्हणजे, त्यांनी या साथीचा गावात शिरकाव रोखणे व हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे. पण, तेच गंभीर न होता बेजबाबदारपणे वागत आहेत. ग्रामीण भागात सध्या टायफॉईड, मलेरिया तसेच कोविड लक्षणे असलेली रुग्ण वाढत आहेत. पण, पॉझिटिव्ह आल्यास दवाखान्यात भरती करून घेतील, पुढे काय काय होईल, या भीतीने चाचणी करून घेण्यापासून पळ काढत आहेत. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने ग्रामीण भागात कोविड चाचणीला मर्यादा आली आहे. नाही परिणामी ही अदृश्य रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामदक्षता समित्या व्हाव्यात सजग
तालुक्यातील १८ गावे सील करण्यात आली आहे. तेथील ग्रामदक्षता समित्या थोड्याफार कार्यरत असल्या तरी काही अपवाद वगळता ‘इतर ठिकाणी रुग्ण निघाल्यावर बघू’च्या भूमिकेत आहेत. गावात साथीचा शिरकाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात उदासीन आहेत. ग्राम दक्षता समिती सदस्यही फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. मास्कविना त्यांचा सर्वत्र वावर दिसून येतो. लोक आमचं ऐकत नाहीत, अशी ओरड मात्र करतात .एका घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण होत असून, कालपर्यंत साथीपासून दूर असलेला ग्रामीण भाग वेगाने विळख्यात येत आहे.