इर्विन रुग्णालयात म्युकरमायकोसिसवरील औषधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:22+5:302021-05-31T04:10:22+5:30
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. नऊ रुग्णांच्या शस्त्रक्रियादेखील झालेल्या आहेत. मात्र, त्यावरील प्रभावी औषध ...
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. नऊ रुग्णांच्या शस्त्रक्रियादेखील झालेल्या आहेत. मात्र, त्यावरील प्रभावी औषध असलेल्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा साठा संपल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड १४ मध्ये रविवारी म्युकरमाकोसिसचे १३ रुग्ण दाखल होते. याव्यतिरिक्त ९ रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सद्यस्थितीत १३ रुग्ण साधारण स्थितीत उपचार घेत आहेत. तेथील डॉक्टर्स श्रीकांत महल्ले, सुजीत डांगोरे, नम्रता सोनोने हे नियमित तपासणी करून शस्त्रक्रिया करीत आहेत. शस्त्रक्रियेलासुद्धा प्रतिसाददेखील मिळत आहे. परंतु, त्यावर प्रभावी ठरणाऱ्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा पुरवठा नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या आवश्यक असलेले औषध ॲम्फोटेरिसि-बी, आयट्राकोनॅझोल, फ्लुकोनॅझोल या औषधींचा साठा संपल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध भांडार विभागाशी संपर्क केला असता, सध्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा साठा संपला असून, वरूनचा पुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
देशभरात हीच स्थिती
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर प्रभावी असलेले ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा पुरवठा रुग्णांच्या मागणीनुसार विशिष्ट प्रक्रियेने करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केला जातो. हे इंजेक्शन खासगीत उपलब्ध नसल्याने इतर रुग्णांना आवश्यकता भासल्यास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या परवानगीनेच संबंधिताला देण्याची तरतूद असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेल्या पत्रकान्वये समोर आहे. यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये आरडीसी नितीन व्यवहारे, सीएस श्यामसुंदर निकम, एफडीए मनीष गोटमारे, जिल्हा समन्वयक सचिन सानप यांचा समावेश आहे.कोट
ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन वाढत्या रुग्णांच्या तुलनेत इर्विन रुग्णालयात कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. म्युकरमायकोसिकवर हे इंजेक्शन प्रभावी असल्याने याचा मार्केटमध्ये काळाबाजार होऊ नये म्हणून सरकारने खरेदी केले आहेत. मार्केटमध्ये ते उपलब्ध झालेले नाही. आपण मागणी केलेली आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक