विद्यापीठ संलग्न १६७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे संकेत
By गणेश वासनिक | Published: September 23, 2023 03:42 PM2023-09-23T15:42:08+5:302023-09-23T15:42:49+5:30
प्राचार्यांनो, तुमच्या जबाबदारीवर महाविद्यालयात प्रवेश करा, कुलसचिवांचे पत्र
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठ संलग्न १६७ अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांनी अद्यापही नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन सादर केले नाही, अशा महाविद्यालयांत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमांचे प्रवेश त्यांच्या जबाबदारीत घ्यावे, अशा आशयाचे पत्र प्राचार्यांना कुलसचिवांनी पाठविले आहे. त्यामुळे ‘नॅक’ नाही तर प्रवेश नाही याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.
कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी २० सप्टेंबर रोजी अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्यांच्या नावे पत्र निर्गमित करून ‘नॅक़’ मूल्यांकन नसल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्या जबाबदारीवर करण्याबाबतचे कळविले आहे. विद्यापीठात ६ जून २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेतील निर्णयानुसार शासनाच्या पुढील आदेशापर्यंत महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या प्रवेशावर विद्यापीठाकडून कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नाहीत, तथापि, महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचे प्रवेश आपल्या जबाबदारीवर करावे, असे पत्रात नमूद आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाकडून ‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांचे प्रवेश रद्द करण्याबाबतची भूमिका घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालकांना शासन निर्देशानुसार ‘नॅक’ मूल्यांकनासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही चार अनुदानित, १६३ अशासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन अहवाल सादर केला नाही. याविषयी प्राचार्यांकडून खुलासा मागविला जाणार आहे.
- डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख नॅक मू्ल्यांकन व मानांकन विभाग, अमरावती विद्यापीठ