ना शपथ; ना दक्षता! सप्ताहाचा बोजवारा
By Admin | Published: November 8, 2016 12:11 AM2016-11-08T00:11:59+5:302016-11-08T00:11:59+5:30
भ्रष्टाचाराविरुद्धच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा यंदा बोजवारा उडाला.
विभागप्रमुख अनभिज्ञ : नागरिकांमध्ये जनजागृतीही नाही
अमरावती : भ्रष्टाचाराविरुद्धच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा यंदा बोजवारा उडाला. केंद्रीय दक्षता आयोगाकडून दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन ३१ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत केले जाते. प्रत्यक्षात या सप्ताहादरम्यान ना शपथ घेतली गेली, ना कुठली दक्षता पाळली गेली.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ आॅक्टोबरला एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यभर शासकीय कार्यालयांमध्ये हा दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. बहुतांश विभागप्रमुख दक्षता सप्ताहाबाबत अनभिज्ञ दिसून आले.
कार्यालयीन इमारतीच्या दर्शनी भागावर भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, अशी सूचना व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्थानिक कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक लिहिलेला कायमस्वरुपी फलक लावण्यात यावा, अशी मुख्य सूचना आहे.
राज्यात २००० सालापासून दक्षता जागरुकता सप्ताह सुरुवात झाला. जनतेमध्ये भ्रष्टाचाराबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध झाल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ आॅक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवडा या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह (व्हिजिलंस अवेरनेस विक) आयोजन करण्यात यावे, अशा सूचना २२ आॅक्टोबर २००१ रोजी सामान्य प्रशासन विभागाने दिल्या होत्या. मात्र बहुतांश विभागांमध्ये केवळ उपचार म्हणून शपथ घेतल्या गेली. एखादे फलक लावून हा सप्ताह साजरा केल्याचे समाधान अधिकाऱ्यांनी मानले. (प्रतिनिधी)
कार्यक्रमाला फाटा
कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावणे अपेक्षित असताना अपवाद वगळता हे फलक कुठेही लावण्यात आले नाहीत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असताना कार्यक्रमाला फाटा देण्यात आला.
नागरिक दूरच
राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त करायचे, हे या सप्ताहातील महत्त्वपूर्ण कार्य. मात्र पुरेशा जनजागृती आणि प्रसिद्धीअभावी या सप्ताहाची उपयोगिता आणि भ्रष्टाचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न कागदावर राहिला.