मास्कशिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:01+5:302021-01-21T04:13:01+5:30
२ विद्यार्थ्यांत ६ फूट अंतर, बसायला जमिनीवर वर्तुळ, चौकाेण, विद्यार्थी नाका-तोंडात बोट घालणार नाहीत अनिल कडू परतवाडा : २७ ...
२ विद्यार्थ्यांत ६ फूट अंतर, बसायला जमिनीवर वर्तुळ, चौकाेण, विद्यार्थी नाका-तोंडात बोट घालणार नाहीत
अनिल कडू
परतवाडा : २७ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या वर्ग ५ ते ८ च्या अनुषंगाने मास्कशिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नाही. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही मास्क सक्तीचा करण्यात आला आहे.
शाळेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थी व शिक्षकांमधील अंतर सहा फूट राहणार आहे. वर्गात जमिनीवर काढलेल्या वर्तुळ किंवा चौकोणात हे विद्यार्थी बसतील. डेस्क वा बाकांवरसुद्धा झिगझ्याग पद्धतीने ६ फूट अंतर ठेवूनच विद्यार्थी बसणार आहेत.
जबतक दवाई नहीं, तबतक ढिलाई नहींचे सुत्र शिक्षण विभागाने अंगिकारले आहे. ऑक्सिमीटर व थर्मल गन खरेदी करून शाळांना शिक्षक आणि विद्यार्थी यांची दररोज ताप व ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करावी लागणार आहे. त्याच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. शाळेत परिपाठ होणार नाही. विद्यार्थी शाळेत जेवणार नाहीत. लघवीला किंवा पाणी पीण्याकरिता एकत्र येणार नाहीत. स्वत:च्या वस्तू-वहीपेन, मास्क, पाणीबाटली एकमेकांना देणार नाहीत. तोंडात, नाकात, डोळ्यात बोटे घालणार नाहीत, याकडे शाळेसह शिक्षकांना लक्ष द्यावे लागणार आहे.
शाळेत गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांवर भर दिला जाणार असून, शाळा किमान ३ तास व कमाल ४ तास घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाचे आहेत. सकाळी १० ते दुपारी २ अशी शाळेची योग्य वेळ देण्यात आली आहे. निर्जंतुकीकरणासह स्वच्छतेवर शिक्षण विभागाचा जोर असून मास्क न वापराऱ्यांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याची ताकिदही शिक्षण विभागाकडु देण्यात आली आहे.
बॉक्स
नियम दुर्लक्षीत
यापूर्वी २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग शिक्षण विभागाकडून सुरू केल्या गेले आहेत. यात कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी, करावयाच्या उपाययोजना आणि पाळावयाची नियमावली शिक्षण विभागाने दिली आहे. परंतु आज या नियमावलीकडे करावयाच्या उपययोजनांकडे अनेक शाळांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शाळांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात नाही. काही शाळांमध्ये दररोज वर्गखोल्या झाडल्या जात नाही. डेस्क, बेंच पुसले जात नाहीत. मास्ककडेही दुर्लक्ष असून काही शाळांमधील शिक्षक व विद्यार्थांना या मास्कचा विसरच पडला आहे. अनेक शाळांमध्ये नियमित शिक्षकांची विद्यार्थ्यांची तापमापी व ऑक्सिजन लेव्हलही दररोज नोंदवली जात नाही. काही शाळांमधील थर्मलगन व ऑक्सिमीटर ना दुरुस्त आहेत. शाळा निर्जंतुकीकरणासाठी, थर्मलगन व ऑक्सिमीटर विकत घेण्याकरिता काही शाळांमध्ये शिक्षकांकडून पैसे गोळा केले गेले. पैशांकरिता शिक्षकांमागे तगादा लावला जात आहे.