शहरातील संकुलांची पार्किंग झाली 'मिस्टर इंडिया', वाहने पार्क करायची कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 01:32 PM2021-11-01T13:32:58+5:302021-11-01T14:23:54+5:30
राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे.
अमरावती : पार्किंगच्या नावाखाली शहरातील काही संकुलांनी सार्वजनिक रस्ताच गिळंकृत केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक ठिकाणचे पार्किंग स्थळ तळघरात असून, ते अद्याप सुरू करण्यात न आल्याने संकुलासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी, वाहनांच्या रांगा लागत आहे.
शहरातील बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिक संकुले सोडली, तर बहुतांश व्यावसायिक संकुलधारकांनी पार्किंगची जागा गिळंकृत केली आहे, तर अनेक ठिकाणी संकुलधारकांकडून सार्वजनिक जागेचा वापर हक्काचे, आमचेच पार्किंग म्हणून केली जात आहे. अनेकांकडून पार्किंग स्थळ खुली केली नसताना महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने अशा संकुलामधील प्रतिष्ठानांना दिलेली परवानगी संशयाच्या भोव-यात अडकली आहे. या व्यवहारात महापालिकेतील अनेकांचे खिसे गरम झाल्याचे वास्तव आहे. भोगवटदार प्रमाणपत्राशिवाय ‘दुकाने’ चालविली जात आहेत.
महापालिका वा अन्य शासकीय यंत्रणाच्या मालकीचे मोकळे भूखंड पार्किंगच्या नावाखाली घशात घालण्याचे उद्योग तर सुरू नाही ना, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने ‘नो पार्किंग’मधील ती वाहने उचलून दंड वसूल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक देखील अधिकृत पार्किंगस्थळीच आपली वाहने लावतील. दरम्यान, शहरातील अनेक संकुलाची पार्किंग ‘मिस्टर इंडिया’ झाल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या एडीटीपी विभागाने अशा इमारतींना, संकुलांना ‘बीसीसी व ओसी’ देताना त्यातील प्रतिष्ठानने परवानगीआधीच सुरू तर करण्यात आली नाही ना, याची खातरजमा करण्याची देखील गरज आहे. परवानगी देताना त्या व्यापारी प्रतिष्ठानाच्या पार्किंगची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील बाजार परवाना विभागावर येऊन ठेपली आहे.
‘बीसीसी’ नसताना ओपनिंग ?
कुठल्याही इमारतीचे वा संकुलाचे बांधकाम नकाशानुसार पूर्ण झाल्यानंतर बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट अर्थात ‘बीसीसी’ दिले जाते. त्यानंतर अग्निरोधक यंत्रणेसह अन्य मूलभूत सुविधा, नकाशाप्रमाणे बांधकाम झाले की नाही, त्याची खातरजमा केल्यानंतर ‘ऑक्युपंन्सी सर्टिफिकेट’ दिले जाते. मात्र, या दोन्ही सर्टिफिकेटआधीच मॉलमधील दुकानांचा, गाळ्यांचा वापर कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘बीसीसी व ओसी’ असल्याखेरीज कुठल्याही संकुलाचा, इमारतीचा वापर करता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या बाजार परवाना विभाग व एडीटीपी विभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकमल चौकात लागतात रांगा
राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे. जी जागा पार्किंगसाठी आरक्षित ठेवायला हवी होती, त्याठिकाणी दुकाने काढण्यात आली. तर काही ठिेकाणी भंगार साठविण्यात आले आहे. एवढ्या बड्या संकुलांना वाहनतळाशिवाय परवानगी मिळालीच कशी, असा सवाल आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर वाहने ठेवावी लागतात. चोरीला गेल्या की भूर्दंड सहन करावा लागतो तो वेगळाच.