तिन्ही फोनवर 'नो रिस्पॉन्स'

By admin | Published: August 10, 2016 11:52 PM2016-08-10T23:52:31+5:302016-08-10T23:52:31+5:30

नागपंचमीला प्रथमेशला घरी आणावयाचे होते. आम्ही उत्साहात होतो. शाळा व्यवस्थापनाने संपर्कासाठी तीन क्रमांक दिले होते.

'No Response' on all the phones | तिन्ही फोनवर 'नो रिस्पॉन्स'

तिन्ही फोनवर 'नो रिस्पॉन्स'

Next

शंकर महाराज आश्रमातील प्रकरण : - तर टळला असता प्रथमेशवरील प्रसंग
अमरावती : नागपंचमीला प्रथमेशला घरी आणावयाचे होते. आम्ही उत्साहात होतो. शाळा व्यवस्थापनाने संपर्कासाठी तीन क्रमांक दिले होते. आदल्या सायंकाळी, शनिवारी तिन्ही क्रमांकांवर सतत संपर्क केला. एकही फोन स्वीकारला गेला नाही. 'तुला न्यायला आई आणि आजी येणार आहेत', असा निरोप प्रथमेशला देण्यासाठी फोन केला होता. निरोप देण्यात आला असता तर कपडे बांधून तो तयारीत असता. त्याच्यावर गुदरलेला प्रसंग टळला असता.
प्रथमेशच्या गुणांवर आणि वागणुकीवर अभिमान बाळगणारे त्याचे पिता अवधूत सगणे यांनी 'लोकमत'शी बोलताना दाटलेल्या कंठाने मन हलके केले. अवधूत सगणे हे नागपूर येथे प्रथमेश दाखल असलेल्या इस्पितळात आहेत. प्रथमेशच्या आरोग्याची ते हरघडी कामना करीत असतात. जे घडले त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. प्रथमेशच्या आई आणि काका-काकूदेखील इस्पितळात आहेत.
काय होणार कारवाई?
वसतिगृहात विद्यार्थी वास्तव्याला असतील तर त्यांची संपूर्ण जबाबदारी अधीक्षकांची आणि व्यवस्थापनाची ठरते. पिंपळखुटा येथील शंकरमहाराज यांच्या आश्रमाच्या आवारात असलेले 'संत श्री शंकरबाबा समाजकल्याण वसतिगृह' हे शासन अनुदानित आहे. शासनाचे तमाम नियम त्यामुळे व्यवस्थापनाला बंधनकारक आहेत. विद्यार्थ्यांसाठी आलेले निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध करून देणे, हे वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापनाचे कर्तव्य ठरते. वसतिगृह हे बंदीगृह नसल्याने आणि शिक्षणाच्या अनुषंगाने केलेली वास्तव्याची अधिकृत सोय असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांशी आणि कुटुंबियांना पाल्यांशी संपर्क साधण्याची उपलब्धी आवश्यक आहे. प्रथमेशच्या वडिलांनी व्यवस्थापनाने दिलेल्या तिन्ही क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही फोन स्वीकारला गेला नाही, हा अधीक्षकांच्या सदोष कार्यपद्धतीचा पुरावा ठरतो. अधीक्षकांवर व्यवस्थापनाची देखरेख असल्यामुळे तेदेखील कायदेशीररित्या जबाबदार ठरतात, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तीन दूरध्वनी क्रमांकांपैकी एक अधीक्षकाचा क्रमांक होता, हे उल्लेखनीय. सणाच्या अदल्या दिवशी, अर्थातच फोन येणे अपेक्षित असतानाच्या कालावधीत पाल्याशी संपर्क न होणे हा मुद्दा व्यवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नव्हती, याकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे. लहानग्यांच्या वसतिगृहातील या सदोष कार्यपद्धतीची दखल जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्ंयानी घेणे गरजेचे ठरते.

ही तर प्रथमेशची बदनामी
प्रथमेश टोकाला जाणाऱ्या मानसिकतेचा मुलगा नाही. त्याच्या गळ्यावर तीन वार आहेत. ते खोल आहेत. अन्ननलिकेपर्यंत पोहोचले आहेत. काही मंडळी प्रथमेशने हे वार स्वत:च केल्याची विनाकारण चर्चा घडवून आणत आहेत. आत्मघात करावा, असा माझा मुलगा नाहीच. शंभर नव्हे माझ्या मुलावर माझा हजार टक्के विश्वास आहे. आत्मघाताची कुणी चर्चा घडवून आणत असेल तर माझ्या प्रथमेशच्या बदनामीचाच तो डाव आहे, असे रोखठोक मत त्याच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी कधी देणार 'शो कॉज'?
पिंपळखुटा आश्रमातील संत श्री शंकरबाबा समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्याचा गळा ठार मारण्याच्या उद्देशाने कापला गेला. चिमुकल्या प्रथमेशने वैद्यकीय इलाजाला प्रतिसाद दिल्यामुळे तो बचावला; तथापि अनुदानित वसतिगृहात आणि तेदखील धार्मिक आश्रमाच्या आवारात इतका गंभीर प्रकार घडूनही जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतरही संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कर्तव्याला जागून भाऊराव चव्हाण हे वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावतात की पाठिशी घालतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 'No Response' on all the phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.