-आता माघार नाही !
By admin | Published: April 26, 2017 12:08 AM2017-04-26T00:08:27+5:302017-04-26T00:08:27+5:30
संवैधानिक मार्गाने आंदोलन पुकारल्यानंतरही भामोरेंचे डोळे उघडत नसतिल तर आता दारु दुकान हद्दपार करुनच दाखवू , आता माघार नाहीच,....
महिलांचा एल्गार : केशव कॉलनीतील दारु दुकान हटवा
अमरावती : संवैधानिक मार्गाने आंदोलन पुकारल्यानंतरही भामोरेंचे डोळे उघडत नसतिल तर आता दारु दुकान हद्दपार करुनच दाखवू , आता माघार नाहीच, असा दम केशव कॉलनी येथील आंदोलनकर्त्या महिलांनी भरला. दारू दुकानाविरुद्ध महिला एकवटल्याने सायंकाळच्या सुमारास तेथील स्थिती तणावपूर्ण बनली होती. सोमवारी करण्यात आलेले भजन आंदोलन आणि मंगळवारी सकाळपासून दारू दुकानासमोर मांडलेल्या ठिय्यामुळे दारू दुकान सलग दोन दिवस कुलूपबंद राहिले.
सोमवारी दारू दुकानासमोर भजन गायन केल्यानंतर लागोपाठ दुसऱ्या दिवसी येथील नागरिकांनी ठिय्या देऊन दारू दुकान हद्दपार करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली. केशव कॉलनी या उच्चभ्रू वस्तीतील क्लासिक अपार्टमेंटमध्ये भामोरे यांच्या मालकीचे दारूचे दुकान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारुची दुकाने हद्दपार झालीत. त्यामुळे मद्यपींचा ओढा अंतर्गत भागातील दारू दुकानांकडे वळला. केशव कॉलनीतील "आनंद लिकर्स" त्याला अपवाद ठरले नाही. शहरातील मद्यपींचा मोठा लोंढा येथे दिवसरात्र येऊ लागला. तेथेच दारू घ्यायची, तेथे ढोसायची आणि तेथेच लोळायचे, असा दिनक्रम सुरू झाला. मद्यपींच्या या धिंगाण्यामुळे येथील समाजमन पुरते हादरले. विद्यार्थी आणि महिलांनी तर चक्क रस्ता बदलविला आणि समाजमनाने आंदोलनाची हाक दिली.
बुधवारी प्रतिकात्मक आंदोलन
अमरावती : अगदी १६ वर्षांच्या मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण या दारू दुकानावर गर्दी करीत असल्याने स्थानिक नागरिकांची शांतता भंग झाली. त्या पार्श्वभूमीवर हे दारू दुकान येथून हद्दपार करावे, या मागणीसाठी महिला-पुरुषांनी एल्गार पुकारला आहे. मंगळवारी १०० च्या वर आंदोलनकर्ते दारू दुकानासमोर ठिय्या मांडून बसले असताना दारू विक्रेतेदेखील त्याच परिसरात ठाण मांडून बसले होते. डोळ्यातून धमक्याही दिल्या जात होत्या. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. सायंकाळच्या सुमारास भामोरे बंधुंनी आंदोलनकर्त्यांशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र यशस्वी तोडगा निघू शकला नाही. दरम्यान प्रतिकात्मक निषेध म्हणून आंदोलनकर्ते दारु दुकानासमोर बुधवारी सकाळी लिंबू शरबतचे वितरण करणार आहे. केशव कॉलनी स्थित हे दारू दुकान बंद करण्यात यावे, यासाठी येथील महिला शक्ती प्रचंड आग्रही असल्याने त्यांच्यावर दबाव टाकण्याच्या उद्देशातून दारु विक्रेत्यांनी भांडोत्री गुंड आणल्याचा आरोपही येथील महिलांनी केला.
वडाळी येथील दारु दुकान हद्दपार करण्यासाठी यशस्वी झुंज देणाऱ्या महिलांनी मंगळवारी केशवकॉलनी स्थित दारु दुकान हटविण्यासाठी एकवटलेल्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती दखल
केशवकॉलनी स्थित दारु दुकानानजीक जमणाऱ्या गुंड तरुणांचा परिसरातील नागरिकांना असह्य त्रास आहे. गाड्या फोडणे, महिलांना शेरेबाजी करणे, घरात शिरुन मारणे, रस्त्यावर काच फोडणे, परिसरातील घरात दारुच्या बाटल्या फेकणे अशी कृत्ये त्या परिसरात सातत्याने होतात. या मुद्याची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना घटनास्थळी जाण्याचे कडक आदेश दिले होते. मंडलिक गेले खरी परंतु तेथील गुंडगिरी कायमच राहिली. पोलीस आमच्या खिशात आहेत, या गुंडांच्या वाक्याला त्यामुळे अर्थ प्राप्त झाला.
चर्चा फिस्कटली
नागरिकांची आक्रमकता पाहून दारु दुकानाचे संचालक बॅकफुटवर आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्यातून ठोस निष्कर्ष निघू शकला नाही. आनंद भामोरे, गोपी भामोरे या संचालकांसह अन्य विक्रेत्यांनीही कॅम्प नागरिक कृती समितीशी चर्चा केली.
अतुल गायगोलेंना जीवे मारण्याची धमकी
आंदोलनात सहभागी असलेले अतुल गायगोले यांना सकाळी अज्ञात फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आंदोलन बंद करण्याचीही भाषा धमकीदरम्यान वापरण्यात आली. त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात नोंदविली.