दिवाळीत रेल्वे गाड्यात ‘नो रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:52 AM2017-10-21T00:52:39+5:302017-10-21T00:52:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळी उत्सवानिमित्त घरी आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे गाड्यांमध्ये परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. बहुतांश गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक झळकत असल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर कसे रुजू व्हावे, ही चिंता सर्वांनाच सतावू लागली आहे.
पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली आदी प्रमुख शहरांमध्ये रोजगार, नोकरी, उद्योगधंदे, कामानिमित्त असलेले अनेक जण दरवर्षी दिवाळी उत्सव घरी येऊन आप्तेष्टांसोबत साजरा करतात. दोन-चार दिवस दिवाळीत नातेवाइकांसोबत घालवून पुन्हा परतण्याचे ते बेत आखतात. मात्र, यंदा रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातकडे जाणाºया गाड्यांमध्ये पाय ठेवणेही कठीण आहे. अशातच एसटी बस कर्मचाºयांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचाही मोठा फटका गावखेड्यातून प्रवास करणाºयांंना सहन करावा लागत आहे. पुणे, मुंबई मार्गे जाणाºया रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहेत. अमरावती-मुंबई एक्सप्रेस ३१ आॅक्टोबरपर्यंत ‘हाऊसफुल्ल’ आहे, तर नागपूर-पुणे गरीब रथचे पुढील दोन महिने आरक्षण नाही, असे संगणकावर दिसून येते. हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेस, मेल आणि हावडा- कुर्ला शालीमार एक्सप्रेसमध्ये सुद्धा आरक्षण नसल्याने मुंबई कशी गाठायची, हा पेच गावी आलेल्यांसमोर निर्माण झाला आहे.
प्रवाशांचे दिवाळे, दलालांची दिवाळी!
पुणे, मुंबईला परतण्यासाठी २१ व २२ आॅक्टोबर रोजी आरक्षण मिळावे, यासाठी चाकरमान्यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत; मात्र मुंबईसाठी द्वितीय श्रेणीच्या आरक्षण तिकिटासाठी सुमारे २५०० ते ३००० रुपये मोजावे लागत आहेत. पैसे मोजूनही रेल्वे तिकीट मिळत नाही, असे विदारक चित्र आहे. यंदाची दिवाळी रेल्वे तिकीट दलालांसाठी लाभ‘लक्ष्मी’ ठरली असून प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.