स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:00 AM2021-04-17T05:00:00+5:302021-04-17T05:00:53+5:30
कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली.
गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दरदिवशी कोविड, सारी व इतर आजारांनी ८ ते १३ व्यक्ती दगावत आहेत. परिणामी अंत्यविधीसाठी हिंदू स्मशान संस्थेच्या प्रशासनावर ताण येत आहे. ओटे उपलब्ध नसल्यास खुल्या जागेवर मृतदेहाचे अंत्यविधी सोपस्कार आटोपले जात आहेत. शुक्रवारी एकूण २६ मृतदेहांवर अंत्यविधी पार पडले.
कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी स्मशानभूमीची पाहणी केली असता, हेच चित्र निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता कोरोना, सारी व इतर आजाराने दगावलेले १६ रुग्ण, तर नैसर्गिकरीत्या दगावलेल्या १० जणांचा अंत्यविधी आटोपला.
एप्रिलमध्ये १५ दिवसांत कोरोनाचे ७५ बळी
एप्रिल महिन्यात कोरोनाने ७५ बळी घेतले. यात १ ते १५ एप्रिलपर्यंतचा समावेश आहे. मृतांमध्ये तरुणांचाही समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. १ ते ९ एप्रिल दरम्यान एक अंकी, तर १० ते १५ एप्रिल दरम्यान कोरोनाने बळींचा आकडा दोन अंकी झाला. शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले असले तरी येथील हिंदू स्मशानभूमीत १६ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शुक्रवारी ६८० संक्रमित, तिघांचा मृत्यू
शुक्रवारी ६८० कोरोना संक्रमित निष्पन्न झाले, तर गत २४ तासांत तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ८४९ नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत ५५,१७७ रुग्ण संक्रमित झाले आहेत. १५१० उपाचारार्थ दाखल आहेत. दिवसभरात १०१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत ५०,२६१ जणांनी कोरोनावर मात केली. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ६९२, तर ग्रामीण भागात १९६२ रुग्ण आहेत. कोरोनाचे आतापर्यंत ७५२ बळी झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ४,१५४, रिकव्हरी रेट ९१.०९ टक्के आहे.
लाकूड ओले, सरण जळण्यास विलंब
हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. ओट्यांची संख्या तोकडी आहे. त्यातच लाकूड ओले असल्याने आधी जमिनीवर डिझेल टाकावे लागते. त्यानंतर सरण जळते. त्यातही बराच वेळ लागतो, असे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.