ना वर्कआॅर्डर, ना टेंडर तरीही काढली देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2016 12:41 AM2016-05-07T00:41:28+5:302016-05-07T00:41:28+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे करण्यात आलेली ३ लाख रूपयांची हायमास्ट विद्युतीकरणाची कामे ...
स्थायी समितीची बैठक : बबलू देशमुख आक्रमक
अमरावती : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे करण्यात आलेली ३ लाख रूपयांची हायमास्ट विद्युतीकरणाची कामे विना वर्कआॅर्डर व विना टेंडर करण्यात आली आहेत. विद्युत सहायक अभियंत्याने ही कामे करून देयके काढल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी ही बाब चव्हाटयावर आणली. याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे ही बैठक चांगलीच गाजली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विविध शासकीय योजना व निधीतून बांधकामे केली जातात. यामध्ये नवीन इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र्र, उपकेंद्र, तीर्थक्षेत्र सभागृह, विश्रामगृह अशा शासकीय इमारतीत विद्युतीकरणाची कामे केली जातात.
त्रयस्थ यंत्रणेचा समावेश करा
अमरावती : ही कामे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आल्याचे देशमुख यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. इतकेच नव्हे तर ब्राम्हणवाडा थडी गावात हायमास्ट बसविण्याचे सुमारे तीन लक्ष रूपयांचे काम मंजूर होते. मात्र, या कामाची कोणतीच निविदा, वर्कआॅर्डर नसतानाही ही कामे परस्पर करून देयके देखील काढण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी केली आहे. याशिवाय सभेत हा विषय उपस्थित होताच जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात जुनेच एसी बसवून नवीन एसीची देयके काढल्याचे सदस्य रवींद्र मुंदे, बबलू देशमुख यांनी सीईओ व अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
रवींद्र मुंदे, सुधीर सूर्यवंशी, अभिजित ढेपे यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली. सदस्यांच्या आक्रमक भावना लक्षात घेता. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांनी चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडे यंत्रणा नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत चौकशी केली जाईल. मात्र, या चौकशीत त्रयस्थ यंत्रणेचा समावेश करावा, अशी सूचना देशमुख यांनी केली. याशिवाय एसी प्रकरणी सीईओ, कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीचे आश्वासन सीईओ सुनील पाटील यांनी सभागृहात दिले. सभेला जि.प.अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृशाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, सदस्य बबलू देशमुख, सुधीर सूर्यवंशी, रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे, प्रमोद वाकोडे, चित्रा डहाणे, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, वित्तअधिकारी चंद्रशेखर खंडारे, अनिल जवंजाळ व खातेप्रमुख उपस्थित होते.
गर्ल्स हायस्कूल, सायंस्कोअर शाळेवरील होर्डिंग काढणार
जिल्हा परिषदेच्या गर्ल्स हायस्कूल व सांयस्कोअर शाळेच्या मैदानावर खासगी होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे सर्व होर्डिंग्स काढण्यात यावे, असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. यापैकी गर्ल्स हायस्कूल शाळेच्या आवारात एक होर्डिंग लावण्यास तीन वर्षांपूर्वी परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेने केवळ १ लाख रूपयांत हा करार केला. परंतु यावर प्रतीदिवस ३० हजार रूपयांप्रमाणे लाखो रूपयांची कमाई होत असल्याने हा करार रद्द करून झेडपीच्या माध्यमातून लिलाव करण्याचा निर्णयसुध्दा स्थायी समितीने घेतला आहे.