शहरात उघड्यावर निजणाऱ्या बेघरांना रात्रनिवाऱ्याचा ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:56+5:30
विकासाकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या अमरावतीमध्ये कायमस्वरूपी बेघरांची समस्याही मोठी आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या आडोशाला किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर निद्रा पुरी करावी लागत आहे. अशा परिस्थितीतील वृद्ध व बालकांची आबाळ होते. त्यांच्या सुविधेकरिता दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अमरावती महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे आधार उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अमरावती : तुम्हाला एखादा बेघर रात्रीच्या सुमारास उघड्यावर निजलेला आढळला, तर त्याच्याबद्दल कणव व्यक्त करून पुढे जाऊ नका. त्याच्याजवळ जा आणि महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या बडनेरा येथील ‘आधार’ रात्र निवारा केंद्राचा पत्ता द्या. या रात्र निवारा केंद्रात ४० हून अधिक व्यक्ती रात्र घालवतात. त्यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे.
विकासाकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या अमरावतीमध्ये कायमस्वरूपी बेघरांची समस्याही मोठी आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या आडोशाला किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर निद्रा पुरी करावी लागत आहे. अशा परिस्थितीतील वृद्ध व बालकांची आबाळ होते. त्यांच्या सुविधेकरिता दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत अमरावती महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे आधार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरी निवारा केंद्र बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील चांदणी चौकात सुरू करण्यात आले आहे.
शहरातील उघड्यावर झोपणाºया बेघर लोकांकरिता हे रात्र निवारा केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. या निवाऱ्यामध्ये राहण्याची, आंघोळीची, पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची आणि अपंग व वृद्ध व्यक्तींसाठी मोफत जेवणाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक ज्योती राठोड, व्यवस्थापक सुशीलदत्त बागडे, काळजीवाहक संजय धवने आदी यासाठी राबत आहेत.
भिक्षेकऱ्यांना दाखवा वाट
शहरातील बेघर, भिक्षेकरी यांना रस्त्यावर भिक्षा न देता नागरिकांनी रात्रनिवारा केंद्राचा रस्ता दाखवावा. संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते शहरात रात्री ९ ते १२.३० पर्यंत पेट्रोलिंगवर राहतात. ते स्वत: उघड्यावर निजणाºया व्यक्तींशी संवाद साधून केंद्रात आणतात. त्यांच्याशी संपर्क करून अशा व्यक्तींसदर्भात माहिती देता येईल, असे कळविण्यात आले आहे. या केंद्रात दिव्यांग व्यक्तीदेखील कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.
भिक्षेकऱ्यांच्या संगोपनासाठी शहरातील दानदात्यांनी वस्तू, जुने वर्तमानपत्र, जुने कपडे वा पैशांच्या स्वरूपात देणगी द्यावी. याशिवाय आपल्या कुटुंबातील वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तेरवी, पुण्यतिथी आदी कार्यक्रम रात्र निवारा केंद्रावर येऊन बेघर लोकांसोबत साजरे करावेत.
- राजू बसवनाथे, अध्यक्ष, पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी