पिंपळखुटा येथील आश्रमशाळा नव्हे, विद्यार्थ्यांचा कोंडवाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:32 AM2019-08-08T01:32:45+5:302019-08-08T01:33:10+5:30

आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित अचलपूर तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांसाठी सुविधा बेपत्ता आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी येथे उघड्यावर आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे, निकृष्ट जेवण हेच आहे. शासनाचे आतापर्यंत कोट्यवधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे वास्तव चौकशी समितीपुढे आले.

Not the ashram school at Pimphalkhata, the students' closet! | पिंपळखुटा येथील आश्रमशाळा नव्हे, विद्यार्थ्यांचा कोंडवाडा!

पिंपळखुटा येथील आश्रमशाळा नव्हे, विद्यार्थ्यांचा कोंडवाडा!

googlenewsNext
ठळक मुद्देनाल्याचे दूषित पाणी विहिरीत : लाखोंचे अनुदान, सुविधा बेपत्ता; नेत्यांसाठी कमाईचे साधन

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित अचलपूर तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांसाठी सुविधा बेपत्ता आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी येथे उघड्यावर आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे, निकृष्ट जेवण हेच आहे. शासनाचे आतापर्यंत कोट्यवधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे वास्तव चौकशी समितीपुढे आले. या समितीला सर्व सुविधा बेपत्ता आढळून आल्या.
माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटीच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला लाखो रुपयांचे अनुदान शासनातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी दिले जाते. मात्र, कुठल्याच सुविधा उपलब्ध न करता आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो रुपयांची लूट सुरू आहे. लोकप्रतिनिधींनीच आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे करून लुटमार चालवल्याने इतरांचे काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आश्रमशाळा संहितेनुसार कुठल्याच सुविधा येथे दिल्या जात नसल्याचे संतापजनक चित्र आहे. गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांनाही शासनाच्या कुठल्या सुविधा आपणास मिळतात, याची जाण नाही आणि याविरुद्ध शिक्षकांपुढे बोलण्याची हिंमत होत नसल्याने ३० वर्षांपासून हा अपहार सुरू आहे. राजकीय ताकदीवर आपले कोणी काहीच करू शकत नाही, याचा गर्व शासकीय आश्रमशाळेचे संपूर्ण नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची पोलखोल समितीने केली.

कोंडवाड्यात झोपा, उघड्यावर आंघोळ
आदिवासी आश्रमशाळा संहितेनुसार विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग, गादी, उशी, चादर, पेटी आदी साहित्य देणे क्रमप्राप्त आहे. परंतु, हे आदिवासी विद्यार्थी दोन टिनाच्या ओसरीत जमिनीवरच झोपत असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. प्रत्येकी २० स्नानगृह आणि शौचालय आवश्यक असताना, अपुºया संख्येतील स्नानगृहावरही छत नाही.

ही आहे समिती
आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे, तहसीलदार निर्भय जैन व तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण कोरडे या समितीत आहेत. त्यांनी पिंपळखुटा आश्रमशाळेत शिकणाºया शिशुपाल सुनील बेलसरे या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी केली.

नाल्याचे दूषित पाणी विहिरीत
दत्तप्रभू आश्रमशाळेच्या भिंतीलगत नाला वाहतो. त्याचे पाणी विहिरीत पडते. तेच पाणी विद्यार्थ्यांना थेट पिण्यासाठी दिले जाते. प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे यांनी गत महिन्यात सर्व आश्रमशाळांना पत्र देऊन सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यास बजावले होते. यासंदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता आदिवासी पालकांनी केली आहे.

Web Title: Not the ashram school at Pimphalkhata, the students' closet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा