ना पोहोचले भारतीय, ना भाजपचे चिटपाखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:04 PM2018-11-26T23:04:11+5:302018-11-26T23:04:53+5:30
बेशरमचे झाड लावण्यासाठी येणाऱ्या तुषार भारतीय यांची आ. रवी राणा, नवनीत राणा आणि समर्थकांनी दुपारी ३.३० वाजेपर्यंत प्रतीक्षा केली; पण ना भारतीय पोहोचले, ना भाजपचे चिटपाखरू. अखेर भारतीय यांच्या घोषणा वल्गनाच ठरल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेशरमचे झाड लावण्यासाठी येणाऱ्या तुषार भारतीय यांची आ. रवी राणा, नवनीत राणा आणि समर्थकांनी दुपारी ३.३० वाजेपर्यंत प्रतीक्षा केली; पण ना भारतीय पोहोचले, ना भाजपचे चिटपाखरू. अखेर भारतीय यांच्या घोषणा वल्गनाच ठरल्या.
राणा यांच्या घरासमोर सोमवारी बेशरमचे झाड लावणारच, अशा गर्जना तुषार भारतीय यांनी चार दिवस सतत केल्या. प्रसिद्धी माध्यमांनीही त्यांच्या या निर्धाराला भरभरून प्रसिद्धी दिली; पण भाजप कार्यालयापासून राणा यांच्या घराच्या दिशेने कूच केलेल्या भारतीय यांनी ऐनवेळी माघार घेतली. 'आज शहीद दिवस आहे. पोलीस अत्यंत तणावात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही येथेच थांबतो,' असे कारण देऊन ‘झाड लावणारच’ हा स्वत:च केलेला संकल्प भारतीय यांनी स्वत:च मोडीत काढला.
तिकडे राणा समर्थकांनी भारतीय यांना 'याच, आम्ही वाट बघतो,' असे आव्हान दिले होते. राणा यांनी त्यांच्या घरासमोर संविधान दिन आणि मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानिमित्ताने त्यांनी बायका-पुरुषांची जमविलेली गर्दी डोळ्यांत भरणारी होती. भारतीय यांनी दुपारी दोन वाजता पोहोचण्याची वेळ दिली होती. राणा यांनी सव्वातीन वाजेपर्यंत वाट बघितली. नवनीत राणा यादेखील सोबतीला होत्या. भारतीय मात्र तेथे पोहोचलेच नाही.
झाडच काय, कुंपण घाला, बगीचा लावा!
गरिबांचे लग्न लावा, आरोग्यासाठी मदत द्या, किराणा द्या, विधवांना मदतीचा हात द्या आणि मग झाडच काय, माझ्या घराला बेशरमचे कुंपण घाला, बगीचाही लावा, अशा शब्दांत राणा यांनी भाजपजनांच्या राजकारणाची टर उडविली.
बेडकांची ही जात
निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे पैदास होणारी बेडकांची ही जात आहे. त्यांचे ड्रँव, ड्रँव करणे सुरू झाले आहे. पण भाजपकडून नेमके लढणार कोण, असा सवाल त्यांनी तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी यांना उद्देशून केला. इच्छुकांची सर्वाधिक तगडी स्पर्धा माझ्या बडनेरा मतदारसंघात असते. या बेडकांची लायकी डबक्याबाहेरची नाहीच, हे मी दशकभरापासून अनुभवतोय. आला नाहीत, बरेच केले. आहात तेथेच थांबा, अन्यथा ज्या पायाने आलात, त्या पायाने परत जाणार नाही, असा खणखणीत इशारा राणा यांनी भाजपजनांना दिला.
पालकमंत्र्यांनी उचकविले
बेशरमचे झाड लावण्याच्या मुद्द्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सर्व ताकद पणाला लावली. यंत्रणा वारली. बेडकांना उचकविण्यामागेही तेच आहेत. याद राखा, मी तु्म्हाला पुरून उरेन. जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन, असा इशारा राणा यांनी पोटे यांना दिला. राणा यांनी पालकमंत्र्यांचा पुन्हा ‘बालकमंत्री’ असा उल्लेख केला.
मुख्यमंत्र्यांकडे करा तक्रारी
बेशरमहो, झाड काय लावता? हिंमत असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा. तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी तुमचेच ऐकू नये, यापेक्षा तुमची आणखी बेशरमकी काय असावी, असा जाहीर सवाल राणा यांनी भाजपजनांना केला.