पोटे पालकमंत्री नव्हे, बालकमंत्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:57 AM2018-11-16T00:57:46+5:302018-11-16T01:00:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील कल्याणनगर ते यशोदानगर यादरम्यान सिमेंट क्राँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन यापूर्वी झाले आहे. मात्र, आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील कल्याणनगर ते यशोदानगर यादरम्यान सिमेंट क्राँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन यापूर्वी झाले आहे. मात्र, आता नव्याने शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे हे याच रस्त्याचे उद्घाटन करणार असल्याने हा प्रकार पालकमंत्री नव्हे तर एक बालकमंत्री करू शकतो, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली.
राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०१८ रोजी या रस्त्याचे विधीवत शासकीयरीत्या उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देखील उपलब्ध केला. आता पालकमंत्री पोटे आणि नगरसेवक तुषार भारतीय यांची रस्ते उद्घाटनाची नौटंकी कशाला? असा सवाल आ. राणा प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे. जनतेच्या विकास कामात अडथळा टाकण्याऐवजी पालकमंत्र्यांनी तितका वेळ सकारात्मक कामात द्यावा, असा सल्लाही आ. राणांनी दिला. तुषार भारतीय यांनी मोठी स्वप्न बघण्यापेक्षा प्रभागातच लक्ष दिल्यास बरे होईल. प्रभागातील नाल्या, रस्ते, अस्वच्छता, पथदिवे, डेंग्यूचा प्रकोप असल्याची शेलकी देखील त्यांनी लगावली. प्रभागात अनेक समस्या असताना तुषार भारतीय यांनी शहरात नव्हे प्रभागात लक्ष दिल्यास नागरिकांना थोडाफार दिलासा मिळेल, असा सल्ला देण्यास आ. राणा विसरले नाहीत. विकास कामात आडकाठी आणणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या रस्त्याची निविदा, कंत्राटदारांची नियुक्ती, प्रशासकीय मान्यता आदी प्रक्रिया अगोदरच पार पडल्या. मात्र, आता प्रशासनावर दबावतंत्र वापरून नव्याने त्याच रस्त्याचे उद्घाटन म्हणजे पालकमंत्र्याचे हे बालकपणाचे लक्षण आहे, असे आ. राणा म्हणाले. या रस्त्याचे दोन महिन्यांपासून कामे खोळंबली आहे. पालकमंत्र्यांनी बराच अडथळा आणला. मात्र, गुरूवारी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरूवात झाली. त्यामुळे विकासविरोधी लोकप्रतिनिधींना आता जनता धडा शिकवणार, असे आ.राणा म्हणाले.