सीसीटीव्ही आहेच ना, मग गार्डची गरज काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:25 AM2017-12-06T00:25:35+5:302017-12-06T00:26:13+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाहीत. कोणीही केव्हाही मशीनशी छेडछाड करू शकतो.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाहीत. कोणीही केव्हाही मशीनशी छेडछाड करू शकतो. शहरात खात्यातून परस्पर पैसे उडविण्याची सर्वाधिक प्रकरणे स्टेट बँकेशी संबंधित आहेत. मात्र सीसीटीव्ही आहे; मग माणूस ठेवायचा कशाला, अशी बेपर्वा उत्तरे स्टेट बँकेचे अधिकारी देत आहेत. यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरातील बँक खात्यातून परस्पर रक्कम लंपास जात असल्याच्या धक्कादायक घटना एका पाठोपाठ घडल्या. बँकांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची चिन्हे होती. अखेर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीच शहरातील बॅक अधिकाºयांची बैठक बोलावली. तरीदेखील बहुतांश एटीएमवर गर्दी व सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे आणखी सायबर गुन्हेगार सक्रिय होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या भोंगळ कारभाराचा फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय टोळीने शहरातील तब्बल २० बँक खात्यांतून तब्बल २४ लाखांपर्यंतची रोख चोरली. दोन महिन्यानंतर पोलिसांना दिल्लीतील या टोळीचा सुगावा लागला. त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस खात्याने खर्च केला. मात्र, एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे पोलिसांच्या परिश्रमाचे फलित काय, असा प्रश्न पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
सीपींच्या सूचनांचे पालन केव्हा?
एटीएमच्या सुरक्षेविषयी पोलीस आयुक्तांनी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून बैठक घेतली होती. एटीएमवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमा, एकच व्यक्ती प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था करा, सीसीटीव्ही कॅमेºयांची पडताळणी करा, सीसीटीव्ही कॅमेºयात पैसे काढणाºयांचे चेहेरे स्पष्ट दिसावेत, बँक अधिकारी व कर्मचाºयांनी वेळोवेळी एटीएमवर जाऊन सीसीटीव्ही व मशीनची पाहणी करावी आदी सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, शहरातील स्टेट बँकेच्या बहुतांश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, एटीएमच्या आत गर्दी दिसून येते.
सीसीटीव्ही आहेत. यामुळे माणूस ठेवावा लागत नाही. हा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. पोलिसांच्या सूचना व मागणीचा प्रस्ताव पुनर्विचाराकरिता वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- अश्विन चौधरी,
क्षेत्रीय प्रबंधक