पाऊस थांबेना! सलग चार तास २० गावे धारणी मुख्यालयापासून ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 03:20 PM2022-07-14T15:20:53+5:302022-07-14T15:30:14+5:30

अमरावतीत आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

'Not Reachable' from 20 villages holding headquarters for four hours in a row | पाऊस थांबेना! सलग चार तास २० गावे धारणी मुख्यालयापासून ‘नॉट रिचेबल’

पाऊस थांबेना! सलग चार तास २० गावे धारणी मुख्यालयापासून ‘नॉट रिचेबल’

Next
ठळक मुद्देमेळघाटातील सिपना, तापी नदीचा रुद्रावतार नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

परतवाडा-धारणी : सिपना, तापी नदीला आलेल्या पुरामुळे धारणी तालुक्यातील २० गावांचा दुपारी १ वाजेपासून सुमारे तीन तास मुख्यालयाशी संपर्क तुटला. त्यानंतर सुरळीत झाला. उतावली येथील पुलावरून पाच फूट पाणी वाहत होते. मोर्शी तालुक्यात मायवाडीनजीक माडू नदीत एक इसम वाहून गेल्याची माहिती आहे. चिखलदऱ्यातही पावसाचा जोर कायम होता. अपर वर्धा धरणाची तीन दारे सायंकाळी सातच्या सुमारास उघडण्यात आली. पूर्णा प्रकल्पाची पाच दारे सकाळी ११ वाजेपासून, तर सपन प्रकल्पाची दोन दारे सायंकाळी उघडण्यात आली होती. अमरावती शहरातही दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली.

सिपना नदीला बुधवारी दुपारी पूर आला होता. या पुरामुळे दिया गावाजवळून वाहणाऱ्या नदीवरील पुलावरून पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे जवळपास २० गावांचा संपर्क धारणी मुख्यालयाशी ४ वाजेपर्यंत तुटला होता. यामध्ये उकुपाटी, निरगुडी, केकदा, चेथर, चटवाबोड, काटकुंभ, बुलुमगव्हाण, भोंडीलावा, वैरागड, कुटांगा, रंगुबेली, खामदा, कोपमार, कोबडाढाणा, हरदा आदी गावांचा समावेश आहे. उतावली येथे सिपना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दुपारी जवळपास तीन तास वाहतूक खोळंबली असून, हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, पाटिया, आठनादा, तांगडा या गावांचा धारणी मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे खरीप हंगामातील धान, ज्वारी, तूर, कापूस, मका आदी पिकांना धोका निर्माण झाला आहे.

आमनेर किल्ल्याला पाण्याने वेढले

तापी आणि गडगा नदीच्या संगमावर दोन्ही नद्यांचे विस्तीर्ण पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यापुढे आमनेर किल्ला आहे. जवळपास एक किमी अशा विस्तीर्ण पात्रात हा किल्ला वेढल्याचे मोहक दृश्य बुधवारी दृष्टीस पडले.

सेमाडोह येथे ७५ मिमी पाऊस

मागील दोन दिवसांपासून पावसाने मेळघाटात जोरदार हजेरी लावली आहे. चिखलदरा व सेमाडोह येथे बुधवारी व्याघ्र प्रकल्पाच्या हवामान नोंदीनुसार प्रत्येकी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी परिसरातून वाहणारी सिपना नदी दुथडी भरून वाहू लागली.

चिखलदरा मार्गावर पूर

सेमाडोह ते चिखलदरा मार्गावरील व्याघ्र प्रकल्पाच्या संकुलानजीक नदीवरील पुलावरून पूर वाहून गेला. त्यामुळे अर्धा तास येथील वाहतूक ठप्प होती.

भूतखोरा धोक्याच्या पातळीवर

परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावरील सेमाडोहनजीक मुसळधार पावसामुळे भूतखोऱ्याचा पूल धोक्याच्या पातळीत येत आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यास पाणी पुलावरून वाहण्याची भीती पाहता, आंतरराज्य प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी सुरक्षितता बाळगून व खबरदारीने वाहन चालवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अप्पर वर्धा धरणाचे ७ दरवाजे उघडले

पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठं असलेलं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे १३पैकी ७ दरवाजे ४५सेंटीमीटरने उघडण्यात आले. तर, याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे अमरावती, वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरणाचे सर्व पाणी वर्धा नदीला आल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. सध्या अप्पर वर्धा धरण ७७ टक्के भरलं आहे. तर, अमरावतीत आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Not Reachable' from 20 villages holding headquarters for four hours in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.